विराटचं शतक... सचिनलाही टाकलं मागे

विराटच्या धडाक्यासमोर विंडीज गोलंदाजांचं काहीच चाललं नाही

Updated: Oct 5, 2018, 05:05 PM IST
विराटचं शतक... सचिनलाही टाकलं मागे  title=

मुंबई : कर्णधार विराट कोहलीचा शतक झळकावण्याचा धडाका राजकोट कसोटीतही कायम राहिलेला पाहिलेला मिळाला. त्यानं कसोटीमधील २४ वं शतक झळकावलं. २०१८ क्रिकेट मोसमातील विराटचं हे चौथं शतक आहे. विराट कोहली आणि शतक हे समीकरणच झालंय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही याचीच पुनरावृत्ती आली. 

राजकोट कसोटीत विराट नावाचं वादळ चांगलचं घोंगावलं. त्याला रोखणं कॅरेबियन गोलंदाजांना शक्य झालं नाही. विराटच्या धडाक्यासमोर विंडीज गोलंदाजांचं काहीच चाललं नाही. २०१८ च्या क्रिकेट मोसमात तर विराटची बॅट चांगलीच तळपलीय. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर कोहलीनं भारताची आणखी पडझड होऊ दिली नाही. त्यानं कर्णधाराला साजेशी खेळी केली. भारताचा धावफलक हलता ठेवला.

विराट कोहलीनं २३० चेंडूत १३९ धवांची खेळी केली. त्याच्या शतकी खेळीत १० खणखणीत चौकारांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमध्ये २४ जलद शतक झळकावणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरलाय. त्यानं १२३ डावात २४ शतकं झळकावली आहेत. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानी आहेत. त्यांनी अवघ्या ६६ डावात २४ शतक ठोकण्याची कमाल केली होती. तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २४ शतकं १२५ डावांमध्ये पूर्ण केली होती. विराट कोहलीचं कसोटी कारकिर्दीतील हे २४ वं शतक आहे. तर कर्णधार म्हणून त्याचं हे १७ वं शतक आहे. त्याचप्रमाणे २०१८ क्रिकेट मोसमातील त्याचं हे चौथं कसोटी शतक ठरलंय.

विराट कोहली ही टीम इंडियाची रनमशिन आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्यानं आपला दबदबा कायम राखलाय. कसोटी क्रिकेटमध्ये तर त्याची कामगिरी ही थक्क करणारी आहे. कर्णधारपदाचा कुठलाही दबाव त्याच्या फलंदाजीवर दिसत नाही. आता आगामी काळात विराटनं फलंदाजीचे आणखी नवनवे विक्रम प्रस्थापित करावे अशीच त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.