मुंबई : यूएईमध्ये लवकरच क्रिकेटच्या नवा फॉर्मेटची तयारी सुरु झाली आहे. क्रिकेटच्या या नव्या फॉर्मेटमध्ये शाहीद आफ्रिदी, विरेंद्र सेहवाग, कुमार संगकारा, इंग्लंडचा सध्याचा कॅप्टन इओन मॉर्गन खेळताना दिसतील. डिसेंबरमध्ये सुरु होणारा क्रिकेटचा हा नवा फॉर्मेट टी-10 असेल.
टी-10मध्ये प्रत्येक टीमला 10 ओव्हर दिल्या जातील. ९० मिनीटांच्या खेळामध्ये प्रत्येक टीमला ४५ मिनीट मिळणार आहेत. २००३ मध्ये टी-20 फॉर्मेटला सुरुवात झाली होती. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये २००५ साली पहिली आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच झाली होती. यानंतर टी-20 फॉर्मेट जगभरामध्ये लोकप्रिय झाला.
यूएई क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानी व्यावसायिक सलमान इकबाल टी-10चा हा नवा फॉर्मेट घेऊन आले आहेत. २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीमध्ये या टी-10 मॅच होणार आहेत. पाकिस्तानचा माजी कॅप्टन मिसबाह उल हक, बांग्लादेशचा क्रिकेटपटू शाकीब अल हसन सहभागी होणार आहेत.
क्रिकेटचा हा नवा फॉर्मेट रोमांचित करणारा असल्याची प्रतिक्रिया शाहीद आफ्रिदीनं दिली आहे. तर टी-10 चा परिणाम क्रिकेट जगतामध्ये होईल, असं इओन मॉर्गन म्हणालाय. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या ४ टीमची निवड या महिन्याच्या शेवटी होणार आहे.