मुंबई : वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची घोषणा येत्या 15 एप्रिलला होणार आहे. याआधी अनेक दिग्गज खेळाडूंनी वर्ल्डकपसाठी आपली टीम जाहीर केली आहे. त्यात आता भारताचा माजी तडाखेदार खेळाडू वीरेंद्र सेहवागने वर्ल्ड कपसाठीची ड्रीम टीम जाहीर केली आहे. सेहवागने याबद्दलची पोस्ट ही आपल्या ट्विटर आणि इनस्टाग्राम द्वारे शेअर केली आहे. आयपीएल संपल्यानंतर काही दिवसांनीच वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 30 मे पासून सुरुवात होणार आहे.
सेहवागने आपल्या इनस्टाग्राम पोस्टमध्ये 2015 साली वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेले खेळाडू आणि आणि येत्या वर्ल्ड कपसाठीच्या खेळाडूंच्या नावाचा उल्लेख केला आहे. येत्या वर्ल्ड कपसाठी तुमची कोणती टीम असेल, असे देखील सेहवागने क्रिकेट चाहत्यांना विचारले आहे.
सेहवागने आपल्या ड्रीम टीममधून अंबाती रायुडूला वगळले आहे. रायुडूने वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठीचा उत्तम खेळाडू म्हणून आपली दावेदारी सिद्ध केली आहे. तसेच सेहवागने आपल्या या ड्रीम टीममध्ये अंजिक्य रहाणेला स्थान दिलेले नाही. सोबतच अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला ही डच्चू देण्यात आला आहे.
सेहवागने आपली ड्रीम टीम तयार करताना युवा खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला आहे. सेहवागने आपल्या टीममध्ये ऋषभ पंत, लोकेश राहुल आणि विजय शंकर यासारख्या खेळांडूना टीममध्ये स्थान दिले आहे. यावरून सेहवागचा युवा खेळाडूंवर असलेला विश्वास दिसून येतो. उमेश यादव सुरेश रैना, अक्षर पटेल, अंजिक्य रहाणे, अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी हे खेळाडू 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळले होते. या खेळाडूंचा सेहवागने आपल्या ड्रीम टीममध्ये समावेश केलेला नाही.
सेहवागने आपल्या टीममध्ये काही खेळाडूंना स्थान दिलं नसलं तरी वनडे वर्ल्ड कपसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची़ घोषणा 15 एप्रिल रोजी मुंबईत करण्यात येणार आहे.
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, केदार जाधव, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहाल, विजय शंकर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत.
अधिक वाचा : गंभीरने जाहीर केली वर्ल्डकप २०१९ साठीची त्याची फेव्हरेट टीम