गोssssssल! दहा वर्षांच्या मुलाची थक्क करणारी 'कॉर्नर किक'

अरे..... हे तर अदभूत

Updated: Feb 13, 2020, 03:06 PM IST
गोssssssल! दहा वर्षांच्या मुलाची थक्क करणारी 'कॉर्नर किक'
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : डेव्हिड बॅकहॅम , लिओनेल मेसी आणि अशा अनेक खेळाडूंनी आजवर अफलातून खेळाचं प्रदर्शन केलं. विशेष म्हणजे कॉर्नर किकसाठी हे खेळाडू चांगलेच गाजले. मैदानाच्या एका कोपऱ्यावर उभं राहत आपल्या संघासाठी गोलपोस्टमध्ये फुटबॉल धाडणं ही काही सोपी बाब नाही. पण, तरीही काही खेळाडूंनी ही किमया अगदी सहजपणे केली आहे. अशाच खेळाडूंना भारतातील एक फुटबॉलपटूही टक्कर देत आहे. 

फुटबॉल वर्तुळात सक्रिय असणाऱ्यांमध्ये सध्या कॉर्नर किकमुळे चर्चेत असणारा हा खेळाडू म्हणजे दानी पीके. हा अवघा दहा वर्षांचा खेळाडू भल्याभल्यांना थक्क करत आहे. ९ फेब्रुवारीला झालेल्या एका सामन्यात दानीने कॉर्नर किक मारत उपस्थितांना धक्काच दिला. ऑल केरला किड्स फुटबॉल टुर्नामेंट या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १० वर्षीय दानीच्या प्रशंसनीय खेळाची झलक सर्वांनाच पाहता आली. या स्पर्धेतील तब्बल १३ गोलसाठी त्याला 'प्लेअर ऑफ टुर्नामेंट' म्हणूनही गौरवण्यात आलं. 

भारतीय फुटबॉल संघात एकेकाळी सक्रिय असणाऱ्या आणि फुटबॉल संघाचं कर्णधारपद भूषवणाऱ्या Inivalappil Mani Vijayan आय.एम. विजयन यांनी या अफलातून फुटबॉलपटूचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यातील एका शाळेत तो पाचवी इयत्तेत शिकतो. केरळच्याच  Kerala Football Training Centre (KFTC) clubसाठी तो खेळतो. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ शेअर केले जातात. त्यामध्येच शेअर करण्यात आलेला हा फुटबॉलपटूचा व्हिडिओ पाहता, भारतीय फुटबॉलच्या संघात भविष्यात हे नाव दिसल्यास आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही हे खरं.