Weather Day : पुढील 5 दिवस यलो अलर्ट; थंडी ओसरुन पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : ख्रिसमसच्या आधीच भारतात हवामान खात्याने थंडीच्या लाटेमुळे यलो अलर्ट जाहीर केला आहे. पण आता थंडी ओसरुन अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 22, 2024, 08:08 AM IST
Weather Day : पुढील 5 दिवस यलो अलर्ट; थंडी ओसरुन पावसाची शक्यता title=

राज्यात पुढील दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होताना दिसणार आहे. मुंबई आणि ठाण्यात शनिवारी पहाटे दाट धुक्यांची झालर पसरली होती. पण येत्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे वेध शाळेच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणार आहे. आणि यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार असल्याने इशान्येकडील राज्यांत व विदर्भात पुढील दोन पावसाची शक्यता आहे.

ख्रिसमसच्या दिवशी पाऊस

24 आणि 25 डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असल्याने या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.  25 ते 29  डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. 26 ते 8 डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यंदा नाताळात थंडी नाही तर पाऊस अनुभवता येणार आहे. पण पुन्हा 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

मुंबईसह कोकणात मात्र थंडी

मुंबईसह कोकण सोडून इतर महाराष्ट्रात 24 डिसेंबरपर्यंत पहाटे पाचचे किमान तापमान सरासरीपेक्षा 1 ते 4 अंशाने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवणार आहे. मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशाने खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे अधिक थंडी आहे. मुंबईचे किमान तापमान 19 अंश असून, रात्रीसह पहाटेच्या वातावरणातील गारवा कायम आहे.

भारतातील हवामान 

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवस थंडीची लाट कायम राहील. राजस्थान आणि पंजाबमध्ये दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून, येथेही थंडीच्या लाटेबाबत इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, थंडीची लाट लक्षात घेता, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवसांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये हवामान खूप थंड असेल. IMD नुसार, उत्तर-पश्चिम भारतात थंड लाटेचा प्रभाव नंतर कमी होईल, परंतु 23 डिसेंबरपासून पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र धुक्याचा प्रभाव दिसून येईल. या दोन्ही राज्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.