मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग राहुल द्रविडला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केल्यावर आश्चर्यचकित झाला आहे. द्रविडने सध्यातरी आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यायला हवा होता, असं पॉन्टिंगचं म्हणणं आहे. पॉन्टिंगने देखील पुष्टी केली की, काही लोकांनी त्याला आयपीएल दरम्यान टीम इंडियाचं प्रशिक्षक बनण्यास सांगितलं होतं, परंतु त्याने स्पष्टपणे नकार दिला होता.
ग्रेड क्रिकेटर्स पॉडकास्टशी बोलताना पॉन्टिंग म्हणाला, "द्रविडने प्रशिक्षकपद स्वीकारलं याचा मला धक्का बसला आहे. मी बर्याच लोकांकडून ऐकतो की तो भारतीय अंडर-19 संघाचा प्रशिक्षक म्हणून खूप आनंदी होता. मला त्याच्या कौटुंबिक जीवनाबद्दल जास्त माहिती नाही, परंतु त्याची मुलं अजूनही लहान आहेत."
पॉन्टिंग म्हणाला, "मला आश्चर्य वाटलं की त्याने कुटुंबाऐवजी टीम इंडियाला प्राधान्य दिले. मात्र, द्रविडची प्रशिक्षकपदी नियुक्ती करून योग्य निर्णय घेतल्याचं काही लोकांनी मला समजावून सांगितलं. तो टीम इंडियासाठी नक्कीच चांगली कामगिरी करेल. मलाही टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्याची ऑफर देण्यात आली होती.
आयपीएल दरम्यान मी मुख्य प्रशिक्षक होण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मी ज्या लोकांशी बोललो ते मला प्रशिक्षक बनवण्यासाठी उत्सुक होते. मी टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. यावर माझं पहिलं उत्तर होतं की, मी संघाला वेळ देऊ शकणार नाही.