हाताला 10 टाके असताना ही जेव्हा या भारतीय खेळाडूने आयपीएलमध्ये ठोकलं होतं शतक

आयपीएलमध्ये एका मोठ्या काळानंतर सगळे भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

Updated: Aug 25, 2020, 04:33 PM IST
हाताला 10 टाके असताना ही जेव्हा या भारतीय खेळाडूने आयपीएलमध्ये ठोकलं होतं शतक title=

नवी दिल्ली : आयपीएल 19 सप्टेंबर 2020 पासून यूएईमध्ये रंगणार आहे. आयपीएलमध्ये एका मोठ्या काळानंतर सगळे भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. आयपीएल सीजनमध्ये विराटचा खेळ पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सूक आहेत. विराटने आपल्या खेळीने जगभरात त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विराट कोहलीचं पॅशन आणि फिटनेस अनेकांना प्रेरणा देणारा आहे. विराट कोहलीने एका सामन्यात 10 टांके लागले असताना देखील शतक ठोकलं होतं.

2016 च्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने त्याच्या खेळीने संपूर्ण सीजन गाजवला होता. कोहलीने या सीजनमध्ये 16 सामन्यांमध्ये सर्वाधिक 973 रन केले होते. कोहलीला कोलकाता नाईट रायडर्सच्या विरुद्ध सामन्यात खेळताना दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याच्या हाताला 10 टाके लागले होते. त्यानंतर विराटच्या टीमचा सामना किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध होणार होता.

हाताला दुखापत झाली असल्याने विराट खेळणार नाही असं बोललं जात होतं. पण तसं झालं नाही. पावसामुळे बंगळुरु आणि पंजाबमध्ये 15-15 ओव्हरचा सामना सुरु झाला. विराट मैदानावर उतरला आणि शतकं ठोकलं. विराट कोहलीने शतक ठोकत हे दाखवलं की, वाघ जेव्हा घायाळ होतो तेव्हा तो आणखी घातक होतो.

शतक ठोकल्यानंतर विराटने आयपीएल सीजनमधलं चौथं शतक पूर्ण केलं आणि एक रेकॉर्ड आपल्या नावे केलं. विराटने 50 बॉलमध्ये 12 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने 113 रन केले. ज्यामुळे बंगळुरुने 15 ओव्हरमध्ये 212 रन्सचा डोंगर उभा केला. ज्यामुळे पंजाबचा 82 रनने पराभव झाला.