धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी 7 वाजून 29 मिनिटांनाच का निवृत्त झाला? 1929 आकड्याचं स्पेशल कनेक्शन

Why MS Dhoni Retire At 1929 Hrs: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजच्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 2020 साली निवृत्त झाला होता. मात्र निवृत्त होताना त्याने केलेल्या पोस्टमधील वेळ चर्चेची विषय ठरली. त्याने केलेली पोस्ट सुद्धा अगदी नियोजित म्हणजे सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांची होती. मात्र धोनीने हीच वेळ का निवडली?

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 15, 2023, 02:59 PM IST
धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी 7 वाजून 29 मिनिटांनाच का निवृत्त झाला? 1929 आकड्याचं स्पेशल कनेक्शन title=
धोनीने इन्स्टाग्रामवरुन केलेली निवृत्तीची घोषणा

Why MS Dhoni Retire At 1929 Hrs: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 साली आजच्या दिवशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. फार गाजावाज न करता सोशल मीडियावरील एका पोस्टवरुन धोनीने निवृत्तीची तडकाफडकी घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. धोनी खरंच निवृत्त झाला आहे की ही अफवा आहे हेच अनेकजण तपासून पाहत होते. धोनीने भारताच्या 74 व्या स्वांत्र्यदिनाच्या दिवशीच अचानक सायंकाळी इन्स्टाग्रामवरुन मी निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्याने निवृत्ती जाहीर करताना केलेल्या पोस्टमधील वेळेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच त्याचा जिगरी मित्र सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली. 

काय म्हणालेला धोनी निवृत्तीची घोषणा करताना

धोनीने सोशल मीडियावरुन निवृत्ती जाहीर करताना सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी एक पोस्ट केली होती. "तुम्ही या संपूर्ण प्रवासात दिलेलं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी फार आभारी आहे. 1929 वाजल्यापासून मी निवृत्त झालो आहे असे समजावे," अशा मजकुरासहीत धोनीने एक छोटा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये धोनीला राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळाल्यापासून अनेक विक्रम मोडेपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलेला. व्हिडीओमध्ये धोनीच्या आठवणीमध्ये राहणाऱ्या खेळींबरोबर अनेक चषकांसोबतचे त्याचे फोटोही दाखवण्यात आले होते. भारतासाठी खेळलेल्या शेवटच्या सामन्यात तो धावबाद झाल्याचा क्षणही यात दाखवण्यात आला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

'19:29' चा एवढा स्पष्ट उल्लेख का?

धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट, ट्वीट्स आणि स्टेटसचा पाऊस पडला. धोनीचे किस्से, त्याच्या कामगिरी आकडेवारी आणि त्याच्याबद्दल वाटणाऱ्या भावना अगदी अनेक सेलिब्रिटींनीही व्यक्त केल्या. धोनी असा अचानक का निवृत्ती झाला? सचिन तेंडुलकरप्रमाणे त्यालाही एक निवृत्तीचा सामना खेळायला बीसीसीआयने सांगितलं पाहिजे वगैरे वगैरे बऱ्याच प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. मात्र त्याचवेळी धोनीने अगदी स्पष्टपणे उल्लेख करत रात्री 7 वाजून 29 मिनिटांपासून आपल्याला निवृत्त झाल्याचं ग्राह्य धरावं असं का म्हटलं होतं याबद्दलही चांगलीच चर्चा सोशल मीडियावर झाली.

 '19:29' मागील लॉजिक काय?

धोनीने निवृत्ती जाहीर करताना '19:29' वर एवढा जोर का दिला होता. आश्चर्याची बाब म्हणजे धोनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याची वेळही 19:29 हीच होती. अनेकांनी यामागील तर्क शोधण्याचा प्रयत्न करताना वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या. काही चाहत्यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार '19:29' ही तीच वेळ होती जेव्हा 2019 साली भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा सामना पराभूत होऊन उपांत्यफेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला होता. या सामन्यामध्ये धोनी अगदी काही इंच अंतराने धावबाद झाल्याने विजयाकडे घौडदौड करताना भारतीय संघ रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. हाच सामना धोनीच्या कारकिर्दीमधील शेवटचा एकदिवसीय सामना ठरला.

19:29 मागील गुजरात आणि आर्मी कनेक्शन

'टाइम्स ऑफ इंडिया'ने धोनीच्या निकटवर्तीयांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार धोनीने 19 वाजून 29 मिनिटांचा वेळ निवडण्यामागे गुजरात कनेक्शन होतं. भारतातून सूर्यास्त अगदी शेवटपर्यंत दिसेल अशी जागा म्हणजे गुहार मोती. भारताचा सर्वात पश्चिमेकडील बिंदू म्हणून गुजरातमधील गुहार मोतीला ओळखलं जातं. 15 ऑगस्ट 2020 ला याची ठिकाणाहून भारत भूमीवरुन सूर्यास्त अगदी शेवटपर्यंत दिसला होता. म्हणजेच भारतात सूर्य मावळण्याची वेळ धोनीनं साधली असं या सूत्रांनी सांगितलं. "धोनीने ज्या पद्धतीने 19.29 चा उल्लेख केला होता तो पाहता त्याचं सुरक्षा दलांबद्दल असणारं प्रेम अधोरेखित होतं. सुरक्षा दलांकडूनही एकमेकांना मेसेज पाठवले जाताना अशीच शैलीची भाषा वापरली जाते," असं या व्यक्तीने म्हटलं होतं. 

अनेकांनी असाही जोडला संबंध

काहींनी '19:29' हा क्रमांक म्हणजे 'एंजल्स नंबर' असल्याचं म्हटलं. आपल्या आयुष्यातील एखादं महत्त्वाचं काम करुन ते काम संपवल्याचा इशारा या क्रमांकाच्या माध्यमातून दिला जातो. 1929 साली आलेल्या आर्थिक मंदीबरोबरही काहींनी '19:29' या निवृत्तीच्या वेळाचा संबंध जोडला होता. मात्र निवृत्तीला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही धोनीने कधीच या '19:29' क्रमांकामागील तर्काबद्दल भाष्य केलेलं नाही.

धोनीच्या शेवटच्या सामन्यात काय घडलं होतं?

भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या 2019 च्या उपांत्यफेरीच्या सामन्यामध्ये महेंद्र सिंग धोनी आणि रविंद्र जडेजाने भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी एकत्र मिळून 116 धावांची पार्टरनशीप केली. सातव्या विकेटसाठी त्यांनी ही पार्टरशीप केली. धोनीने 50 तर जडेजाने 70 धावा केल्या. भारताला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 31 धावांची गरज असताना मँचेस्टरच्या ओल्ट ट्रेफोर्डच्या मैदानामध्ये धोनी 49 व्या ओव्हमध्ये बाद झाला. धोनीने 49 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनला उत्तुंग षटकार लगावल्याने 11 चेंडूंमध्ये 25 असं सरळ समीकरण झालं. भारत आता धोनीच्या भन्नाट फिनिशिंगच्या जोरावर सामना जिंकणार असं वाटत असतानाच उलट घडलं. धोनीने षटकार मारुन अर्धशतक झळकावल्यानंतर पुढला चेंडू निर्धाव गेला. त्याच षटकामध्ये नंतर मार्टीन गप्टीलने 50 यार्डावरुन केलेल्या थ्रोने थेट स्टम्पचा वेध घेतला आणि धोनी काही इंच फरकाने बाद झाला. धोनी बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि न्यूझीलंडने अंतिम फेरीत धडक मारली.