बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगलेला 'दिल्लीकर' Asia Cup मध्ये खेळणार; संघात झाली निवड

Rape Accused Cricketer To Play In Asia Cup 2023: आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडियन प्रमिअर लिगमध्येही हा खेळाडू खेळला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून हा खेळाडू 2018 साली खेळला आहे. त्याला बलात्काराच्या आरोपामुळे अटक होऊन तुरुंगामध्येही जावं लागलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 15, 2023, 12:46 PM IST
बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगलेला 'दिल्लीकर' Asia Cup मध्ये खेळणार; संघात झाली निवड title=
हा खेळाडू 2018 च्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळला होता

Rape Accused Cricketer To Play In Asia Cup 2023: पाकिस्तान आणि बांगलादेशनंतर नेपाळने आगामी आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या संघाची घोषणा करताना नेपाळच्या संघाचं कर्णधारपद अवघ्या 20 वर्षांच्या तरुणाकडे सोपवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माप्रमाणेच नेपाळच्या कर्णधारचं नावही रोहित आहे. नेपाळचं कर्णधारपद 20 वर्षीय अष्टपैलू खेळाडू रोहित पाउदेलकडे सोपवण्यात आलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून खेळलेला फिरकी गोलंदाज संदीप लामिठानेलाही संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा असलेली आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान भरवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश हे 6 संघ सहभागी होणार आहेत.

पाकिस्तानमध्ये सरावासाठी जाणार

नेपाळ क्रिकेट संघाने (सीएएन) आपल्या सोशल मीडियार अकाऊंटवरुन आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात कोणाकोणाला स्थान देण्यात आलं आहे याची यादी पोस्ट केली आहे. सीएएनने दिलेल्या माहितीनुसार नेपाळचा संघ पाकिस्तानमध्ये होणाऱ्या एका आठवड्याच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होणार आहे. येथे नेपाळचा संघ पाकिस्तानमधील संघांविरोधात सामने खेळून सराव करणार आहे. नेपाळचा संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये अ गटामध्ये आहे. या गटात नेपाळबरोबर भारत आणि पाकिस्तानचा संघ आहे. 

या खेळाडूवर झालेला बलात्काराचा आरोप, तुरुंगात गेला, बंदीही घालण्यात आली पण...

नेपाळच्या संघामध्ये संदीप लामिछानेला संधी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संदीपने एका तरुणीचा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याला मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नेपाळ क्रिकेट संघाने निलंबित केलं होतं. संदीपला काठमांडूमध्ये अटक करुन तरुंगात पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला. जामीनावर बाहेर आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. आता त्याला थेट राष्ट्रीय संघामध्ये स्थान देण्यात आल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे.

भारताविरुद्ध कधी खेळणार नेपाळ?

नेपाळचा संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 30 ऑगस्ट रोजी मुल्तानच्या मैदानामध्ये खेळवला जाईल. त्यानंतर नेपाळचा संघ 4 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध सामना खेळणार असून हा सामना श्रीलंकेमधील कॅण्डी येथील मैदानात खेळवला जाईल. 

असा आहे नेपाळचा संघ

रोहित पाउदेल (कप्तान), कुशाल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शारकी, कुशाल माला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंह ऐरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिचाने, ललित राजबंशी, प्रतिश जीसी, श्याम धाकल, संदीप जोरा, किशोर महतो और अर्जुन सौद.