मुंबई: विराट कोहलीनं टी 20 चं कर्णधारपद सोडल्यानंतर वन डेचं कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेतलं. तर आता त्यापाठोपाठ कसोटी क्रिकेटचंही कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. असा तडकाफडकी निर्णय का घेतला यावर आतापर्यंत विराट काहीच बोलला नव्हता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी सीरिजमध्ये पराभव मिळाल्यावर त्याने हा निर्णय घेतला होता.
विराटच्या या निर्णयाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्याने कसोटी कर्णधारपद सोडण्यामागचं नेमकं कारण काय होतं याबाबत खुलासा केला आहे. त्याने चाहत्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देत मौन सोडलं आहे.
नेमकं कारण काय?
कर्णधार म्हणून मला जे हवे होते ते मी साध्य केले. माझा विश्वास आहे की आता फलंदाज म्हणून माझी भूमिका जास्त महत्त्वाची आहे. संघाचा लीडर होण्यासाठी तुम्हाला कर्णधार असण्याची गरज नाही. विराट कोहलीला कसोटीमध्ये गेल्या दोन वर्षात एकही शकत करण्यात यश आलं नाही. याचं दु:ख विराटला एक फलंदाज म्हणून आहे.
विराटच्या या वक्तव्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की गेल्या 2 वर्षांपासून तो फलंदाजीवर नीट लक्ष देऊ शकला नाही. त्याचा त्याला खूप जास्त त्रास होत आहे. या त्रासामुळेच आणि त्यातून होणारी घुसमट टाळण्यासाठी विराटनं हा निर्णय घेतला असावा. विराटनं आपल्याकडे कोणतंच कर्णधारपद ठेवलं नाही, अगदी आयपीएलच्या संघाचंही नाही. आता तो फक्त फलंदाजीवर लक्ष देणार आहे.
धोनीवरही मोठं विधान
एमएस धोनीने जेव्हा कर्णधारपद सोडलं होतं तेव्हा मी टीमचा भाग होतो. याचा अर्थ असा नाही की तो लीडर नव्हता. तो असा एक लीडर होता ज्याच्याकडून शिकण्यासारखं खूप होतं. माझ्याकडे कर्णधारपद आलं तेव्हा मला टीमचं कल्चर बदलायचं होतं. याचं कारण भारतात बुद्धिमत्ता आणि कौशल्याची कमतरता नाही.
रोहितला मिळाली मोठी जबाबदारी
विराट कोहली आता तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधार म्हणून राजीनामा दिला आहे. विराटच्या जागी रोहित शर्माकडे वन डे आणि टी 20चं कर्णधारपद आहे. कसोटी कर्णधारपदही त्याच्याकडे येण्याची शक्यता आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.