मँचेस्टर : आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाने दिलेलं आव्हान भारतीय क्रिकेय संघाने स्वीकारलं खरं. पण, या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र भारतीय संघाची चांगलीच पडझड झाली. एकीकडे संघातील खेळाडू २४० धावांचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नांत अपयशी ठरत होते, तर दुसरीकडे रवींद्र जडेजा मात्र संघाच्या वतीते एकाकी झुंज देताना पाहायला मिळाला.
जडेजाच्या ७७ धावा पाहता भारतीय संघाच्या विजयाच्या आशा कायम होत्या. पण, तो बाद झाल्यानंतर महेंद्रसिहं धोनीसुद्धा खेळपट्टीवर फार काळ टीकू शकला नाही. सामन्याच्या शेवटी कर्णधार विराट कोहली याने संपूर्ण संघाच्या खेळाला दाद देत त्याची खिलाडू वृत्ती दाखवून दिली. पण, आपलीही निराशा झाल्याचं त्याने यावेळी नमूद केलं. जडेजा आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर वादावरही त्याने यावेळी मौन सोडलं.
मला नाही वाटत सध्याच्या घडीला जे काही झालं ज्यानंतर आपण जडेजाला काही बोललं पाहिजे. त्याची कोणत्याही स्थानावर खेळण्याची तयारी होती. मी स्वत: त्याच्यासोबत जवळपास १० वर्षे खेळत आहे. पण, तणावाच्या या परिस्थितीत हा क्षणत अतिशय महत्त्वाचा होता. तो प्रचंड उत्साही आणि प्रेरित होता', असं विराट म्हणाला.
सामन्यात आपल्या संघाची खेळी सावरेल असं वाटत होतं. पण, एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एक चूक, अंमलबजावणीची कमतरता या साऱ्याच किंमत तुम्हाला मोजावी लागते, असं म्हणत त्याने या सामन्याला स्वत:च्या दृष्टीकोनातून स्पष्ट केलं. जडेजाच्या ७७ धावा १ गडी बाद करण्याच्या खेळीचं कौतुक त्याने केलं.
रवींद्र जडेजा हा 'बिट्स ऍण्ड पिसेस' खेळाडू असल्याचं संजय मांजरेकर म्हणाले होते. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी केली. ज्यानंतर त्यांच्यापैकीत एका फिरकी गोलंदाजाऐवजी जडेजाला संधी द्यावी का, असा प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला होता.
प्रश्नाचं उत्तर देत 'मी थोडी फलंदाजी आणि थोडी गोलंदाजी करु शकणाऱ्या जडेजासारख्या खेळाडूंचा चाहता नाही. जडेजा हा सध्या त्याच्या ५० षटकांच्या सामन्यांमध्ये असाच एक खेळाडू आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र तो पूर्णपणे एक गोलंदाज असतो', असं ते म्हणाले होते. मांजरेकर यांच्या या वक्तव्याला जडेजाने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळालं होतं.