World Cup 2019 : टीम इंडियाच्या दोन सदस्यांचा राजीनामा

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, याचसोबत टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

Updated: Jul 11, 2019, 07:00 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियाच्या दोन सदस्यांचा राजीनामा

मॅंचेस्टर : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, याचसोबत टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. टीम इंडियाचा १८ रननी पराभव करून न्यूझीलंडच्या टीमने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. या पराभवासोबतच टीम इंडियाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

टीम इंडियाचे फिटनेस कोच शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी आपला राजीनामा दिला आहे. या दोघांनी आपले राजीनामे बीसीसीआयकडे सूपूर्त केले आहे. 

फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती ट्वीट द्वारे दिली आहे. हे ट्वीट त्यांनी काल रात्री १०.४५ दरम्यान केले होते. टीम इंडिया सोबतचा आजचा माझा अखेरचा दिवस होता. टीम इंडियाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मला संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार, असं ट्विट पॅट्रिक फरहार्ट यांनी केलं. तसंच टीम इंडिया आणि सहकाऱ्यांना त्यांनी भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

या दोघांच्या राजीनाम्यामुळे आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आता बीसीसीआयला नव्या फिटनेस प्रशिक्षक आणि फिजिओचा शोध घ्यावा लागणार आहे. सोहम देसाई हे भारताचे आगामी फिटनेस प्रशिक्षक असतील.

पॅट्रीक फरहार्ट आणि शंकर बासू यांना बीसीसीआयने नवीन कराराची ऑफर दिली होती, पण या दोघांनी विश्रांती हवी असल्याचं सांगत नवा करार करायला नकार दिला.

पॅट्रीक फरहार्ट

शंकर बासू आणि पॅट्रीक फरहार्ट यांच्यामुळे टीम इंडियाचा फिटनेस बऱ्याच प्रमाणात सुधारला. विराट कोहलीनेही आपला फिटनेस सुधारण्यात शंकर बासूंची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं होतं.

शंकर बासू

वर्ल्ड कपदरम्यान आयपीएलच्या वेळापत्रकावर निशाणा साधल्यामुळे शंकर बासू चर्चेत आले होते. शिखर धवनच्या दुखापतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बासू म्हणाले, 'तुम्हाला आवडो अगर न आवडो पण आयपीएलच्या वेळांचा खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होतो. आयपीएलदरम्यान खेळाडू २-३ वाजता झोपतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ट्रेनिंगला येणं हे खेळाडूंसाठी आव्हान असतं. खेळाडूंना झोपेची आणि उठायच्या वेळेचं, पोषक आहार आणि ट्रेनिंगचं महत्त्व कळतं.'