मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड आजपासून महामुकाबला सुरू होणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान हा सामना ड्युक बॉलने खेळवला जाणार आहे. विराटसेना आज शांत आणि संयमी केनवर भारी पडणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मूळचा मुंबईचा असलेला बॉलर न्यझीलंडकडून खेळणार असल्यानं टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार आहे.
न्यूझीलंडने 15 सदस्यांच्या खेळाडूंची घोषणा केली आहे. यामध्ये एजाज पटेलचं नाव देखील आहे. सध्या एजाज फुल फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या 2 कसोटी सीरिजमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये एजाज खेळू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मिचेल सेंटनरला दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडकडे एजाजशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही.
32 वर्षांच्या एजाज पटेलचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. 1988मध्ये मुंबईत त्याचा जन्म झाला. त्याने करियरची सुरुवात वेगवान गोलंदाज म्हणून केली. मात्र पुढे एक उत्तम स्पिनर बनला. सध्या तो स्पिनर म्हणूनच संघात प्रसिद्ध आहे. टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यात तो स्पिनर म्हणून आव्हान देणार आहे. इंग्लंड विरुद्ध एजाजची कामगिरी खूपच उत्तम राहिली आहे.
भारत आणि न्यूझीलंडच्या संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत आजपासून म्हणजेच 18 जून ते 22 जून दरम्यान खेळतील. न्यूझीलंडने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सीरिजमध्ये 2 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला 1-0 ने नमवूनही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता विराटसेना केनच्या टीमवर भारी पडणार की टीम इंडियाला नमतं घ्यावं लागणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.