Corona : कोरोनाच्या संकटात एयरटेलचा दिलासा

कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस देशभरात वाढत चाललं आहे.

Updated: Mar 31, 2020, 04:03 PM IST
Corona : कोरोनाच्या संकटात एयरटेलचा दिलासा title=

मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस देशभरात वाढत चाललं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. याचा सर्वाधिक फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तींना बसणार आहे. कोरोनाच्या या संकटामध्ये एयरटेलने अत्यल्प उत्पन्न गटाच्या या व्यक्तींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एयरटेलच्या ग्राहकांची १७ एप्रिलपर्यंतची इनकमिंग सेवा सुरु राहणार आहे. तसंच एयरटेल अत्यल्प उत्पन्न गटातल्या ग्राहकांना १० रुपयांचा टॉकटाईम देणार आहे.

एयरटेलने त्यांच्या ८ कोटी प्रीपेड ग्राहकांची व्हॅलिडिटी १७ एप्रिलपर्यं वाढवली आहे. येत्या ४८ तासांमध्ये एयरटेलच्या ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे. या कठीण काळामध्ये नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात राहावं, यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया एयरटेलने दिली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचं आयुष्य लॉकडाऊनमुळे अडचणीत आलं आहे, अशा नागरिकांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं भारती एयरटेलचे सीएमओ शाश्वत शर्मा यांनी सांगितलं.

अशाप्रकारची सुविधा देणारी एयरटेल ही भारतातली पहिलीच कंपनी आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊननंतर रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी गावाकडे जात आहेत. जीव धोक्यात घालून हे मजूर प्रवास करत आहेत. हे मजूर १०० किमीपेक्षा जास्त चालत आपल्या गावाला जात असल्याच्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यातून समोर आल्या आहेत.

देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा एक हजारच्या वर गेला आहे. तर २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.