मुंबई : डाटा लीक प्रकरणात फेसबुकनं आणखी एक धक्कादायक खुलासा केलाय. 'फेसबुक'च्या म्हणण्यानुसार, एका थर्ड पार्टी अॅपनं जवळपास ४० लाख युझर्सच्या खाजगी डाटाचा दुरुपयोग केलाय. फेसबुकनं केलेल्या चौकशीत हा खुलासा झालाय. यानंतर, 'मायपर्सनॅलिटी' अॅपला बॅन करण्यात आल्याचं फेसबुकनं सांगितलंय. हे अॅप फेसबुकवर २०१२ पूर्वीपासून अॅक्टिव्ह आहे. फेसबुकनं दिलेल्या माहितीनुसार, हे अॅप ऑडिटसाठी तयार नव्हतं. तसंच या अॅपनं आपल्या रिसर्चर आणि कंपन्यांसोबत हा डाटा शेअर केला. डाटाची सुरक्षा व्यवस्थाही खूपच खराब होती.
'फेसबुक'नं दिलेल्या माहितीनुसार, ज्या युझर्सनं मायपर्सनॅलिटी अॅपसोबत आपली फेसबुक माहिती शेअर केलीय त्यांचा डाटा लीक झालेला आहे. अशा युझर्सची संख्या जवळपास ४० लाखांच्या घरात आहे.
फेसबुकनं मार्च महिन्यात हजारो थर्ड पार्टी अॅपविरुद्ध चौकशी सुरू केली होती. त्याच दरम्यान सोशल मीडिया साईटवर केम्ब्रिज अॅनालिटिकावर युझर्सचा पर्सनल डाटा वापरण्याचा आरोप झाला होता. यानंतर जवळपास ४०० हून अधिक अॅप सस्पेंड करण्यात आले.
यानंतरही वेगवेगळ्या अॅपविरुद्ध चौकशी सुरू राहील. फेसबुक आपल्या युझर्सच्या डाटाच्या सुरक्षेत कोणतीही कसर ठेवणार नाही, असं आश्वासन फेसबुककडून देण्यात आलंय.