मुंबई : दिवसेंदिवस मुलींसाठी असुरक्षित वाटणाऱ्या वातावरणाची चिंता, प्रत्येक मुलीच्या पित्याला सतावत असते. पण चार मुलींचे वडील असणारे लक्ष्मणराव वरपे यांनी अशी चिंता केली नाही, त्यांनी मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं, आणि आपल्या चारही मुलींना एमबीबीएस-डॉक्टर केलं.
लक्ष्मणराव यांनी आपल्या चारही मुलींना डॉक्टर केलं ही एवढीच बातमी नाहीय, तर ज्या ग्रामीण भागात शिक्षण घेण्यास लोक तयार नाहीत, त्याच ग्रामीण भागात लक्ष्मणराव शिक्षक आहेत, तिथेच त्यांच्या मुलींचं प्राथमिक शिक्षण झालं. ग्रामीण शिक्षण कमी नाही हे देखील त्यांनी सिद्ध केलंय.
तुम्हाला असं देखील वाटू शकतं की, डोनेशन भरून या मुली डॉक्टर झाल्या असतील, पण तसंही नाही. या चारही मुली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकल्या आहेत. हा फोटो व्हॉटसअॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे. बुलढाण्यातील चिखलीत वरपे कुटूंब राहतं.
लक्ष्मण वरपे आणि उज्ज्वला वरपे यांना ४ मुली आहेत, चारही एमबीबीएस-डॉक्टर आहेत. स्वाती, साधना, शारदा आणि वर्षा या चारही मुली डॉक्टर आहेत.
हा फोटो सध्या व्हॉटसअॅपवर व्हायरल होत आहे, हमनें बेटियाँ पढाई, बेटीया बचाई, असं या फोटोवर लिहिलं आहे.
वरील फोटोत दिसणाऱ्या मुली या प्रातिनिधिक स्वरूपात आहेत, गावातील लोकांनी गणेशोत्सवात बेटी बचाव, बेटी पढाव साठी हा सजीव देखावा केला होता.