World Highest Paid YouTuber: जिमी डोनाल्ड्सन (Jimmy Donaldson) हे नाव कदाचित तुम्ही यापूर्वी ऐकलंही नसेल. पण हा तरुण जगातील सर्वात श्रीमंत युट्यूबर (Worlds Highest Paid Youtuber) आहे असं सांगितल्यास नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे. स्वीडनमध्ये राहणारा जिमी हा मिस्टर बीस्ट (MrBeast) नावाने युट्यूब चॅनेल चालवतो. त्याच्या या चॅनेलला 16 कोटी 30 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. कोणत्याही एकट्या व्यक्तीकडून चालवल्या जाणाऱ्या युट्यूब चॅनेलला मिस्टर बीस्ट इतके फॉलोअर्स नाहीत. युट्यूबच्या माध्यमातून जिमी अब्जाधीश झाला आहे. मिस्टर बीस्ट नुकताच चर्चेत येण्यामागील कारण ठरलं टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीची झालेली दुर्घटना. या दुर्गटनाग्रस्त पाणबुडीमधून प्रवास करण्यासाठी आपल्यालाही आमंत्रीत करण्यात आलेलं असा दावा जिमीने केला आहे. मात्र आपण हे आमंत्रण स्वीकारलं नाही, असंही जीमीने स्पष्ट केलं आहे.
जिमी डोनाल्डसनची एकूण संपत्ती 820 कोटी इतकी आहे. युट्यूबच्या माध्यमातून श्रीमंत झालेल्या जिमीकडे एक दोन नाही तर तब्बल 5 आलीशान घरं आहेत. जिमी हा जगातील अनेक आलिशान कार्सचा मालक आहे. त्याचं कार कलेक्शनच त्याच्या श्रीमंतीबद्दल बरंच काही बोलतं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. बीएमडब्ल्यू i8 ही जिमीची आवडती कार आहे. त्याच्याकडे लॅम्बॉर्गिनी हुराकन स्पायडरबरोबरच टेस्लाची कस्टमाइज कारही आहे. मात्र जिमी हा केवळ त्याच्या श्रीमंतीसाठी नाही तर तो ज्या सबस्क्राइबर्सच्या जीवावर इथंपर्यंत पोहचला आहे त्याच्यावर बक्षिसांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव करण्यासाठीही ओळखला जातो. जिमी वयाच्या 13 व्या वर्षापासून युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करतो. 2017 साली जिमीने पोस्ट केलेल्या एका युट्यूब व्हिडीओमध्ये त्याने चक्क 1 ते 1 लाखपर्यंतची मोजणी स्वत: म्हणून दाखवल्या होत्या. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि मिस्टर बीस्ट चॅनेलचे सबस्क्रायबर्स यामुळे मोठ्या संख्येनं वाढले.
मिस्टर बीस्टने त्याच्या सबस्क्रायबर्सपैकी 4 कोटीव्या सबस्क्रायबरला एकाच वेळी 40 गाड्या भेट दिल्या होत्या. या गाड्याही आलीशान होत्या, ज्यामध्ये पोर्शे, सेडान, ट्रकपासून कस्टम स्पजबॉब जीप, टेस्ला कंपनीच्या कार्सचा समावेश होता. मात्र या सर्व गाड्या स्वत:कडे न ठेवता या सबस्क्रायबरने त्या पुढील 24 तासांमध्ये अन्य लोकांना देऊन टाकाव्यात अशी अट घालण्यात आली होती. ल्यूक नावाच्या या 4 कोटीव्या सबस्क्रायबरने जिमीचं हे आव्हान स्वीकारलं आणि 24 तासांमध्ये या 40 गाड्या वाटून टाकल्या. जिमीने ल्यूकच्या या दानशूरपणावर खुश होत त्याला टेस्ला कार भेट दिली होती.
मिस्टर बीस्ट केवळ पैसे कमवत नाही तर तो त्याचप्रमाणात पैसा खर्चही करतो. आपल्या 10 कोटीव्या सबस्क्रायबरला त्याने चक्क एक बेट भेट म्हणून देण्याचं आश्वासन दिल्याने एकच खळबळ उडाली होती. 10 कोटीवे सबस्क्रायबर म्हणून 50 जणांची निवड करण्यात आली. या 50 जणांपैकी कोणाला बेट द्यायचं यासाठी स्पर्धेचं आय़ोजन करण्यात आलं. शेवटच्या फेरीत 5 जणांची निवड करण्यात आली. शेवटच्या टास्कमध्ये या 5 जणांना 10 कोटी लिहिलेलं सबस्क्राइब बटण शोधायचं होतं. एका स्पर्धकाने अनेक तास मेहनत केल्यानंतर हे बटण शोधून दाखवलं आणि ते बेट जिंकलं. या स्पर्धेतील इतर 4 स्पर्धकांना मिस्टर बीस्टने रिकाम्या हाती जाऊ दिलं नाही. त्याने या चौघांना प्रत्येकी 41 लाख रुपये दिले.
मध्यंतरी मिस्टर बीस्ट एका रेस्तरॉमध्ये गेला होता. तेथे त्याने एका वेटरला तुला आतापर्यंत सर्वाधिक टिप किती मिळाली आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर या वेटरने मला आतापर्यंत सर्वात जास्त टिप म्हणून 4 हजार रुपये मिळाल्याचं सांगितलं. त्यानंतर मिस्टर बीस्टने तो ज्या कारमधून या रेस्तरॉमध्ये आला होता ती गाडीच वेटरला टिप म्हणून दिली. कारची चावी टिप म्हणून दिल्यानंतर मिस्टर बीस्ट चालत चालतच या हॉटेलमधून निघून गेला.