नवी दिल्ली : गुगलपेज उघडताच आज आपल्याला एक डूडल दिसते. हे डूडल नेहमीच्या डूडलपेक्षा काहीसे हटके दिसते. म्हणूनच या डूडलबद्धल जाणून घेण्याची उत्सूकता मनात निर्माण होते. आमच्या असंख्य वाचकांची उत्सूकता विचारात घेऊन आम्ही तुम्हाला सांगत आहोत आजच्या खास डूडलबद्धल.
गुगलने आजचे डूडल हे फियरलेस नाडिया हिला अर्पण केले आहे. आज नाडियाची 110वी जयंती आहे. म्हणूनच ही संधी साधत गुगलने Fearless Nadia's 110 Birthday या शिर्षकाखाली डूडल बनविले आहे. आपल्या लक्षवेधी आणि थरारक स्टंटसाठी नादिला खास ओळखले जाते. तिचे खरे नाव मेरी इवांस असे होते. मात्र, चित्रपटात काम करताना तिने फियरलेस नाडिया हे नाव घेतले. ती मुळची ऑस्ट्रेलियातील. पण, हिंदी चित्रपटसृष्टीशी तिचे खास नाते जुळले. खास करून एक स्टंटवाली कलाकार म्हणून तिला ओळख मिळाली. तिची स्टंट पाहून भल्याभल्यांना घाम फुटत असे, असे सांगतात. १९३५ मध्ये आलेला 'हंटरवाली' हा तिचा चित्रपट विशेष लोकप्रिय ठरला. तेव्हापासून तिला हंटरवाली म्हणूनच ओळखले जाऊ लागले. तिने काही काळ सर्कसमध्येही नशीब आजमावले होते.
चित्रपट निर्माते होमी वाडिया यांच्यासोबत नाडियाने विवाह केला होता. ९ जानेवारी १९९६मध्ये तिचे मुंबईत निधन झाले. तिचा जन्म ८ जानेवारी १९०८मध्ये ऑस्ट्रेलियात झाला होता. पाच वर्षांची असतानाच नाडिया भारतात आली. तिने भारतात आल्यावर घोडेस्वारी, शिकार, आणि शूटींग सारख्या आव्हानात्मक गोष्टी शिकल्या. नाडियाने 'देश दीपक', 'नूर-ए-यमन' यांसारख्या चित्रपटातही काम केले. मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती 'हंटरवाली' चित्रपटानेच.
हंटरवाली चित्रपटात तिने एका पेक्षा एक असे खतरनाक स्टंट केल्यावर तिच तिची ओळख बनली. विशेष असे की, त्यानंतरच्या प्रत्येक चित्रपटात तिने ही ओळख जपण्याचा प्रयत्न केला. लांकांनीही तिला तशाच स्टाईलमध्ये पसंत केले. स्टंट करताना अनेकदा तिच्या जीवाला धोका होता. पण, तिने त्याची कधीच पर्वा केली नाही. त्यामुळे तिला भारताची स्टंट क्विन म्हणूनही ओळखले गेले.