Car Claim Insurance: मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात पावसाने धुमाकुळ घातला आहे. पावसामुळं रायगड, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर काही सोसायटीतील पार्किंगमध्येही पाणी शिरले आहे. पुराच्या पाण्यामुळं चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात पाणी शिरल्यामुळं इंजिन खराब होते. अशावेळी कारच्या नुकसान भरपाईची किंमत विमा कंपनी देईल का?, त्यासाठी काय करावे लागेल? या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.
तुमच्या कारचे नुकसान झाले असेल आणि विमा कंपन्यांकडून तुम्हाला भरपाई हवी असेल तर मोटर इन्सुरन्स खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळं कारचे कोणतेही नुकसान झाले तरीदेखील तुम्ही इन्सुरन्स क्लेम करु शकणार आहात. मोटर इन्सुरन्स खरेदी करताना सर्वबाजूंनी विचार करुनच खरेदी करा. वाहन विमा दोन प्रकारचे असतात. एक सर्वसमावेशक म्हणजे क्राँप्रिहेन्सीव्ह रिस्क कव्हर आणि दुसरा थर्ड पार्टी इन्शुरन्स.
कार खरेदी केल्यानंतर अनेक वर्ष झाल्यास लोक थर्ट पार्टी विमा खरेदी करतात. मात्र, पुराच्या पाण्यात फसल्यानंतर थर्ड पार्टी विमामध्ये तुम्हाला नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळं शक्यतो क्राँप्रिहेन्सीव्ह रिस्क कव्हर घ्यावा. यामध्ये पाण्यामुळं नुकसान झाले तरी विमा कंपन्यांना नुकसान भरपाईचे पैसे द्यावे लागतात.
विमा खरेदी करताना त्यात इंजिन कव्हरदेखील आहे का याची माहिती घ्या. कारण पुराच्या पाण्यात गाडी अडकल्यास इंजिन लॉक होण्याची शक्यता असते. अशा अवस्थेला हायड्रोस्टेटिक लॉक असं म्हणतात. काही विमा कंपन्या या स्थितीत नुकसान भरपाई देत नाहीत. त्यामुळं विमा खरेदी करताना इंजिन कव्हरसाठी अॅड ऑन हा पर्याय निवडून पाहावा. क्राँप्रिहेन्सीव्ह इंजिन कव्हर वाहनविमा काढणे फायद्याचे ठरु शकते.
पुराच्या पाण्यात गाडी बंद पडल्यास कंपनीला त्याची माहिती द्या. त्यानंतर कंपनीकडून एक माणूस येऊन गाडीचे किती नुकसान झाले, याचा आढावा घेईल. जागेवर सर्वेक्षण करणे शक्य नसेल तर गाडी टो करुन गॅरेजला घेऊन जाईल आणि नुकसानीचा अंदाज कंपनीला कळवला जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नुकसान भरपाई दिली जाईल.
पुराचे पाणी ओसरल्यानंतर तातडीने गाडी सुरु करुन पाहू नका. जोपर्यंत विमा कंपनीच्या निरीक्षक सर्वेक्षण करत नाही तोपर्यंत गाडी सुरू करणे नुकसानीचे ठरु शकते. गाडी सुरु केल्यानंतर इंजिनमध्ये पाणी शिरुन ते पूर्णतः निकामे होईल. विमा करारानुसार गाडी सुरु करण्याचा प्रयत्न आणि त्यातून झालेले इंजिनचे नुकसान कॉन्सिक्वेंशिअल लॉस म्हणजे मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान मानले जाते. त्यामुळं इंजिन दुरुस्तीचा खर्च भरपाईतून वजा केला जाईल.