उन्हाळ्यात AC कितीही सुरु ठेवलात तरी बिल वाढणार नाही, आजमावून पाहा या टिप्स

उन्हाळा वाढल्यानंतर एसीचा वापरही वाढू लागतो. पण याचा परिणाम थेट वीज बिलावर होतो. यामुळे काहीजण घऱात एसी असतानाही त्याचा फार वापर करणं टाळतात. पण एसीचा पुरेपूर वापर करुनही तुम्ही वीज बिल जास्त येणार नाही याची काळजी घेऊ शकता.   

शिवराज यादव | Updated: Apr 16, 2024, 03:10 PM IST
उन्हाळ्यात AC कितीही सुरु ठेवलात तरी बिल वाढणार नाही, आजमावून पाहा या टिप्स title=

उन्हाळा वाढल्याने एसीचा वापरही वाढू लागला आहे. बाहेर रखरखतं ऊन आणि अंगातून येणाऱ्या घामांच्या धारा यामुळे एसीची गार हवा कधी एकदा अंगाला लागते असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे घरी असताना किंवा कामावरुन घरी आल्यावर लगेच एसी सुरु केला जातो. पण हा एसी लावताना मध्यमवर्गीयांना एकीकडे गारवा तर दुसरीकडे मात्र वाढत्या बिलाची चिंता सतावत असते. कारण जितका जास्त एसीचा वापर करु तितका त्याचा परिणाम थेट वीज बिलावर होत असतो. यामुळे काहीजण घऱात एसी असतानाही त्याचा फार वापर करणं टाळतात. पण एसीचा पुरेपूर वापर करुनही तुम्ही वीज बिल जास्त येणार नाही याची काळजी घेऊ शकता. 

पण काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही एसीचा कितीही वापर केला तर वीज बिल जास्त वाढणार नाही. महत्वाचं म्हणजे, यासाठी एसी खरेदी करतानाही तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. एसी खरेदी करताना तुम्ही वीजेच्या वापराबद्दलही जाणून घ्यायला हवं. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा अवलंब करत तुम्ही वीज बिल कमी करु शकता. 

तापमान

अनेकांना असं वाटतं की, एअर कंडिशनचं तापमान जितकं कमी ठेवू तितका गारवा मिळेल. पण हे पूर्णपणे योग्य नाही. लवकरात लवकर वातावरण गार व्हावं या नादात लोक अनेकदा एअर कंडिशनचा फार चुकीचा वापर करताना दिसतात. 

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीनुसार, एअर कंडिशनचं सामान्य तापमान 24 डिग्री ठेवणं ठेवणं सर्वात योग्य आहे. हे तापमान शरिरासाठी योग्य आणि आराम देणारं आहे. इतकंच नाही, एअर कंडिशनमध्ये वाढवण्यात आलेलं प्रत्येक डिग्री तापमान 6 टक्के विजेची बचत करतं. अशात वीजेचं बिल वाचवण्यासाठी एअर कंडिशनचं सामान्य तापमान 18 डिग्री सेल्सिअस ऐवजी 24 डिग्री सेल्सिअस ठेवा. 

जास्त स्टार म्हणजे जास्त बचत

5 स्टार रेटिंग असणारा एअर कंडिशनर तुमच्या रुमला अत्यंत प्रभावीपणे थंड करतं. रुम वेगाने थंड करण्यासह हा 5 स्टार एअर कंडिशनर वीजेचीही बचत करतं. 

टायमर सेट करण्याची सवय लावा

जर तुमच्या एअर कंडिशनमध्ये टायमरची सुविधा असेल तर त्याचा योग्य उपयोग करणं फार फायदेशीर आहे. टायमरसह एअर कंडिशनर बंद आणि सुरु कऱण्यासाठी तुम्ही वेळ ठरवू शकता. ही सुविधा तुम्हाला झोपेत असताना एसी बंद आणि सुरु कऱण्यासाठीच फक्त फायदेशीर ठरत नाही, तर सामान्य वापराच्या तुलनेत वीजही वाचवतं. ही सवय तुम्हाला दीर्घ काळासाठी वीज बील कमी करण्यात मदत करेल. 

निगा राखणंही गरजेचं

एसीचा वापर करताना दरवाजा बंद ठेवला जात आहे याची काळजी घ्या. याचाही बिलावर परिणाम होत असतो. एसी लावल्यानंतर दरवाजे आणि खिडक्या बंद करा, तसंच पडदेही लावा. एअर कंडिशनरदेखील वेगाने आणि प्रभावीपणे रुमला गार करेल. तसंच एअर कंडिशन मशीनवरही फार ओझं पडणार नाही. यामुळे एअर कंडिशन कमी वेळ सुरु राहील आणि वीज बिलही कमी होईल. एसीचा जबाबदारीसह वापर केल्यास तुम्हाला गारवा तर मिळेलच, पण सोबत मशीनही जास्त काळ व्यवस्थित राहील.