जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : सुप्रसिद्ध लेखक आर के नारायण यांनी लिहिलेल्या, आणि शंकर नाग मालगुडी डेजने दूरदर्शनच्या जमान्यात एक वेड लावलं होतं. आजही या मालिकेचे एपिसोड वेड लावतात, आणि पाहिले जातात. मराठीतही कोरी पाटी प्रॉडक्शन नावाचं यूट्यूब चॅनल आहे, यावर गावाकडच्या गोष्टी ही सिरीज तुफान लोकप्रिय होत आहे. ग्रामीण भागातील कथानकावर आधारीत असलेली वेब सिरीज चांगलीच हिट होत आहे, तरूणांनी ही वेब सिरीज डोक्यावर घेतली आहे. या वेब सिरीजला काही महिन्यातच २ लाखांपेक्षा जास्त नेटीझन्सने सब्स्क्राईब केलं आहे. यातील पात्र आता युथच्या तोंडपाठ झाली आहेत, फार कमी खर्चात या वेब सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे.
यासाठी फार जास्त महागड्या गोष्टी वापरण्यात आलेल्या नाहीत, एक कॅमेरा आणि एक चांगला माईक, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अस्सल ग्रामीण कलाकारांची फळी यात आहे. नुसत्याच रेटलेल्या कथा यात नाहीत. तर प्रत्येकाला आपलं बालपण आणि गाव आठवावं लागेल, अशा या गोष्टी आहेत.
अस्सल ग्रामीण कथेचा बाज असलेली ही सिरीज आहे. यातली एक एक व्यक्तिरेखा ही यूट्यूबच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि या सिरिजमध्ये कुठूनही पाहायला सुरूवात करा, तुम्हाला कथानक कळल्याशिवाय राहत नाही. साताऱ्यातील काही युवकांनी एकत्र येऊन हे कोरी पाटी प्रॉडक्शन सुरू केलं आहे.