नवी दिल्ली : 'ह्युंदई'ची ग्राहकांची पसंतीची पावती मिळालेली 'सेन्ट्रो' आज पुन्हा एकदा बाजारात उतरण्यसाठी तयार आहे. सेन्ट्रोला मंगळवारी म्हणजेच आज लॉन्च केलं जाणार आहे. या नव्या हॅचबॅक कारची बुकिंग कंपनीकडून १० ऑक्टोबरपासून २२ ऑक्टोबरपर्यंत सुरू होती.
कंपनीकडून नव्या सेन्ट्रोचं इंजिन, ट्रान्समिशन आणि व्हेरिएन्टबद्दल अगोदरच माहिती दिली गेलीय. कारमध्ये १.१ लीटरचं पेट्रोल इंजिन असेल आणि याची ६९ पीएसची पॉवर आणि ९९ Nm चा टॉर्क असेल. कार ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत बाजारात येईल.
पेट्रोल इंजिनशिवाय कार सीएनजी व्हेरिएन्टमध्येही उपलब्ध असेल. सीएनजी व्हेरिएन्टसोबत हे इंजिन असेल परंतु, त्याची पॉवर कमी होईल. सीएनजीसोबत इंजिन पॉवर ५९ पीएस असेल. सेन्ट्रोचे पाच व्हेरिएन्ट डिलाईट, इरा, मेग्ना, स्पोर्टस आणि आस्ता बाजारात येण्याची शक्यता आहे.
सात इंचाच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, जो अॅपल कार प्ले आणि अॅन्ड्रॉईड ऑटोला सपोर्ट करतो तसंच रिअर व्ह्यू पार्किंग कॅमेरा, रिअर एसी वेंटस असे काही फिचर्स या सेग्मेंटच्या कारमध्ये पहिल्यांदाच दिसणार आहेत. सेन्ट्रोमध्ये एबीएस आणि ड्रायव्हर साईड एअरबॅग असेल...
या कारच्या किंमतीविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नव्या सेन्ट्रोची किंमत ३.७५ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. या गाडीच्या टॉप व्हेरिएन्टची किंमत ५ लाख रुपयांहून अधिक असू शकते.
ही गाडी मारुतीच्या सेलेरियो, वॅगनआर, रिनॉल्ट क्विड, टाटा टियागो आणि डटसन गो यांना टक्कर द्यायला बाजारात उतरेल.