मुंबई : नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिली जाणारी गुणांची खिरापत आता बंद होणार आहे.
भाषा विषयांसाठीची २० गुणांची तोंडी आणि ८० गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केलाय. त्यामुळे यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची १०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे.
हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होणार आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सध्या भाषा, द्वितीय भाषांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात.
या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गुण देण्याची मुभा ही शाळांना असल्याने शिक्षकांकडून अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नववी आणि दहावीचा अंतिम निकाल फुगलेला दिसून येत होता. त्यावर अनेक शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली. यावेळी परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार आता भाषा विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे.
तर संयुक्त भाषा विषयांसाठी ५० गुण प्रत्येकी असा नवा पॅटर्न ठरविण्यात आला आहे. भाषा विषयांची तोंडी परीक्षा यापुढे न घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.