QR Code स्कॅन करताना 'ही' एक चूक अजिबात करु नका; आयुष्यभराची कमाई गमावून बसाल

आजकाल मॉलपासून ते रस्त्यावरच्या भाजीवाल्यापर्यंत प्रत्येकाकडे पेमेंट करण्यासाठी QR Code स्कॅनर असतो. आपणही हे क्यूआर कोड स्कॅन करताना जास्त विचार करत नाही. पण हे करताना काही गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.   

शिवराज यादव | Updated: Nov 21, 2023, 02:32 PM IST
QR Code स्कॅन करताना 'ही' एक चूक अजिबात करु नका; आयुष्यभराची कमाई गमावून बसाल title=

तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर एकीकडे आयुष्य अजून सुखकर होत असताना, त्यासोबत अनेक धोकेही येत असतात. नव्या तंत्रज्ञानाबद्दल आपण अधिक सुशिक्षित नसल्याने फार सहजपणे आपण या धोक्यांना बळी पडतो. सध्या देशात असाच एक फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. क्यूआर कोड स्कॅनच्या आधारे ही फसवणूक केली जात आहे. जर रिपोर्टबद्दल बोलायचं गेल्यास बंगळुरुत 2017 पासून ते 31 मे 2023 पर्यंत फसवणुकीची तब्बल 21 हजार प्रकरणं समोर आली आहेत. यामधील 41 टक्के प्रकरणं क्यूआर कोड स्कॅनशी संबंधित आहेत. यामध्ये बनावट क्यूआर कोडच्या सहाय्याने फसवणूक केली जाते. त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना तितकंच सावध असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. 

काय आहे QR कोड स्कॅम?

क्यूआर कोड स्कॅम एका खास पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये वास्तविक QR कोडमध्ये एक बनावट म्हणजेच छेडछाड केलेला कोड जोडलेला असतो. यानंतर जेव्हा कोणी तो क्यूआर कोड स्कॅन करतो तेव्हा तो दुसऱ्या क्यूआर कोडवर ट्रान्सफर केला जातो. ज्याच्या आधारे तुमची फसवणूक केली जाते. कोड स्कॅन करताच हॅकर्स तुमच्या डिव्हाइसचं संपूर्ण नियंत्रण आपल्या हाती घेतात.

क्यूआर कोड कशाप्रकारे काम करतो?

फसवणूक करणारे एक क्यूआर कोड तयार करतात, जो एका लिंकशी कनेक्ट असतो. हा कोड एखाद्या प्रसिद्ध ब्रँड किंवा कंपनीचा असतो. यानंतर फसवणूक करणारे हा कोड सार्वजनिक ठिकाणी ठेवतात आणि अशाप्रकारे तो स्कॅन करणाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. जेव्हा तुम्ही अशा बनावट क्यूआर कोडला स्कॅन करता तेव्हा तुम्ही एका वेबसाइट किंवा वेबपेजला अॅक्सेस देता. ही वेबसाइट तुमची वैयक्तिक माहिती चोरी करुन तुमचं बँक खातं रिकामं करु शकतात. 

कशाप्रकारे या फसवणुकीपासून स्वत:ला वाचवायचं? 

- सार्वजनिक ठिकाणी असलेले QR कोड स्कॅन करणं टाळा. विशेषतः जे QR कोड विश्वसनीय नाहीत त्यांना स्कॅन करण्याचा मोह अजिबात करु नका.
- QR कोड स्कॅन करण्यासाठी, QR कोड स्कॅनर अॅप वापरावे. जर क्यूआर कोड स्त्रोतापर्यंत पोहोचला नाही, तर तो स्कॅन करणं टाळले पाहिजे.
- फक्त अधिकृत अॅप्सला प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करा. 
- मोबाईलमधील घुसखोरी टाळण्यासाठी सुरक्षा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. तसंच डिव्हाइस नेहमी लेटेस्ट सॉफ्टवेअरसह अपडेट ठेवा.
- जर कोणी तुमच्याकडे ईमेल किंवा मेसेजच्या आधारे वैयक्तिक माहिती विचारत असेल तर ते फसवुणकीचे लक्षण असू शकते.