मुंबई : गेल्या वर्षी भारत सरकारने PUBG गेमवर बंदी घातली होती. तेव्हापासून अनेक जण या गेम पुन्हा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता ही प्रतीक्षा संपली आहे. PUBG गेम निर्माता कंपनी क्राफ्टनने (KRAFTON) व्हिडिओ टीझर्स जाहीर करून भारतात नवीन गेम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. व्हिडिओ टीझरनुसार हा गेम बॅट्लग्राऊंड मोबाईल इंडिया' या नावाने लॉन्च होणार आहे. मात्र टीझरमध्ये लॉन्चची तारीख समोर आलेली नाही. (PUBG to relaunch in India)
क्राफ्टॉनने म्हटले आहे की, प्रथम भारतीय वापरकर्त्यांसाठी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या पूर्व-नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाईल. तरच मोबाईल गेम सुरू होईल. कंपनीने पुढे म्हटले आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (Battleground Mobile India) फक्त भारतीय युजर्ससाठी आहे.
कंपनीने म्हटले आहे की, युजर्सची गोपनीयता आणि डेटा सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. आम्ही डेटा संरक्षित करण्यासाठी इतर कंपन्यांसह काम करत आहोत. कंपनीने पुढे नमूद केले आहे की, केंद्र सरकारच्या नियमांनुसार या गेमचे डेटा सेंटर भारतात तयार केले जाईल.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारत सरकारने पबजीसह 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 118 मोबाइल अॅप्स भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी, भारताचे संरक्षण, राज्य सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. भारतीय युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली होती.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या अॅप्सद्वारे एकत्रित केलेल्या डेटाविषयी अनेक प्रश्न उद्भवू लागले होते आणि राष्ट्रीय सुरक्षेची बाब लक्षात घेऊन त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅप्सवर बंदी घालण्याची मागणीही भारतीय सायबर क्राईम कोर्डिनेशन सेन्सॉर आणि गृह मंत्रालयाने केली होती.