Royal Enfield Goan Classic 350 : अनेक बाईकप्रेमींच्या आवडीच्या आणि पसंतीच्या अशा रॉयल एनफिल्ड या ब्रँडनं नुकतीच एक नवी बाईक लाँच केली आहे. ही बाईक लाँच झाल्या क्षणापासूनच चर्चेचा विषय ठरतेय आणि निमित्त आहे ते म्हणजे बाईकचे फिचर्स, तिचा कमाल लूक.
एनफिल्डनं लाँच केलेल्या या बाईकच्या सीरिजला गोअन क्लासिक 350 असं नाव देण्यात आलं आहे. पाहताक्षणी बाईकचं हे नाव नेमकं किती समर्पक आहे हे लगेचच लक्षात येत आहे. गोअन क्लासिक 350 ही बाईक एक बॉबर स्टाईल वर्जन असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांत म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी या बाईकची किंमत जाहीर करण्यात येणार आहे.
Goan Classic 350 सध्या चार आकर्षक रंगांमध्ये सादर करण्यात आली असून ही बाईक ड्यूअल टोनमध्ये असल्यानं तिचे रंगही आकर्षणाचा विषय ठरत आहेत. Rave Red, Trip Teal, Purple Haze आणि Shock Black अशा रंगांचे पर्याय इथं तुम्हाला उपलब्ध आहेत.
क्लासिक 350 च्याच आधारे गोअन क्लासिक 350 सुद्धा तयार करम्यात आली असली तरीही या बाईकचं डिझाईन आणि काही उपकरणांमध्ये मात्र बदल करण्यात आला आहे. बॉबर लूकला केंद्रस्थानी ठेवतच कंपनीकडून हे बदल करण्यात आले आहेत. डबल डाऊन ट्यूब चेसिस असलं तरीही या बाईकला सबफ्रेम देण्यात आलेली नाही. ही बाईक बॉबर स्टाईल सीटसह उपलब्ध असून, त्यामध्ये डिटॅचेबल अर्थात काढता येण्याजोगी पिलियन सीटही आहे.
बाईकच्या टायरमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, त्यामध्ये ट्यूबलेस वायर-स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. 349 सिंगल सीसीचं इंजिन असणारी ही बाईक 20 बीएचपी पॉवर आणि 27 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. 5 स्पीड गिअरबॉक्स असणाऱ्या या बाईकला सस्पेंशनसाठी टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक अब्जॉर्बर देण्यात आले आहेत. ही बाईक साधारण 197 किलो वजनाची असल्याचं सांगितलं जात आहे.
निवांत आणि अगदी सुशेगाद भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी, त्यातूनही निसर्गाच्या सानिध्ध्यात असणाऱ्या वाटेवर निर्धास्त निघणाऱ्यांसाठी ही बाईक एक उत्तम पर्याय ठरेल. तुलना करायची झाल्यास या बाईकची थेट स्पर्धा Jawa Perak सोबत असेल. बॉबर स्टाईल बाईकमध्येच ही बाईकही येत असल्यानं आता जावा बाजी मारते की गोअन क्लासिक शर्यत जिंकते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.