Rs 3 crore 70 Lakh Annual Salary Job: आर्टिफिशिएल इंटेलिजन्स तंत्रज्ञान 'चॅट जीपीटी'मुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहचलं असं म्हटल्यासं चुकीचं ठरणार नाही. वर्षभराहून कमी कालावधीमध्ये 'चॅट जीपीटी'ने जगभरात तुफान लोकप्रियता मिळवली. आता याच 'चॅट जीपीटी'ची निर्मिती करणाऱ्या 'ओपन एआय' कंपनीने नोकरीच्या जाहिराती जारी केल्या आहेत. कंपनी या नोकऱ्यांसाठी वर्षाला 3.7 कोटी रुपये पॅकेज देण्यास तयार आहे. कंपनीने संशोधक, इंजिनिअर्स आणि वैज्ञानिक पदांसाठी नोकऱ्या उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. आर्टिफिशिएल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यासारख्या क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी या नोकऱ्या उपलब्ध आहेत.
'ओपन एआय'मधील सुरपअलाइन्मेंट विभागाचे प्रमुख जेन लीके यांनी या नोकऱ्यांसंदर्भातील माहिती दिली आहे. कंपनीमध्ये संशोधक, इंजिनिअर्स आणि वैज्ञानिकांची आवश्यकता आहे. आवश्यक कौशल्यांमध्ये मशीन लर्निंग, कोडिंग आणि क्रिटिकल थिकिंगची आवश्यकता असेल. आर्टिफिशिएल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये काम करताना या तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर कसा करता येईल यासाठी अर्ज करणारा उमेदवार प्रयत्नशील हवा असं कंपनीने म्हटलं आहे. एआय तंत्रज्ञान मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाता काम नये या हेतूने काम करताना स्वत:ला पूर्णपणे झोकून देणाऱ्या आणि संपूर्ण समर्पणाने काम करणाऱ्यांच्या आम्ही शोधात आहोत, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
एआय हे जगभरामध्ये चांगली कामं करण्यासाठी फार महत्त्वाचं आणि उपयोगाचं साधन ठरु शकतं. मात्र यासंदर्भात फार काळजीपूर्वक काम होणं गरजेचं आहे. एआय तंत्रज्ञानाची सुरक्षा लक्षात घेऊन ते फार जबाबदारीने निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी कंपनीने पदांसाठीची पूर्ण यादीच आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. या यादीमध्ये संशोधक इंजिनिअर्सला 2.02 कोटींपासून 3.07 कोटींपर्यंतचा पगार देण्यास कंपनी तयार असल्याचं म्हटलं आहे.
'ओपन एआय' कंपनीने दिलेल्या या पॅकेजमध्ये वर्षाला 18 अतिरिक्त सुट्ट्याही दिल्या जातील. तसेच कंपनीकडून भरपगारी 20 दिवसांची पालकत्व रजा आणि फॅमेली प्लॅनिंग सपोर्टही दिला जाईल. तसेच कंपनीकडून 1500 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सव्वा लाख रुपये काही नवीन शिकायचं असेल तर दिले जातील.
पगाराबरोबरच कंपनीकडून इतरही अनेक सुविधा दिल्या जातील. 'ओपन एआय'कडून दिलं जाणारं सॅलेरी पॅकेज पाहून भविष्यात या क्षेत्रात मनुष्यबळाला चांगली मागणी असेल असं दिसून येत आहे. एका अहवालानुसार 2025 पर्यंत जगातील एआयचं मार्केट 390 बिलिअन डॉलर्सच्या कॅपिटलपर्यंत पोहचू शकतं.