Samsung चे फोन मिळणं बंद होणार? कंपनीसमोर मोठं संकट, आता पुढे काय?

Samsung News : तुम्ही सॅमसंगचा फोन वापरताय किंवा सॅमसंगचा नवा फोन घ्यायचा विचार करताय? कंपनी सध्या कोणत्या अडचणीचा सामना करतेय माहितीये?   

सायली पाटील | Updated: Jul 2, 2024, 11:40 AM IST
Samsung चे फोन मिळणं बंद होणार? कंपनीसमोर मोठं संकट, आता पुढे काय?  title=
Samsung phone union workers on general strike latest news

Samsung News : स्मार्टफोनच्या या दुनियेमध्ये सॅमसंगचा बराच बोलबाला पाहायला मिळतो. किंबहुना कमाल कॅमेरा आणि फिचर्ससाठी बरीच मंडळी आजही आयफोनपेक्षा सॅमसंगच्याच मोबाईलला पसंती देतात. येत्या काळातही कंपनीकडून मोबाईलचे नवे मॉडेल लाँच करण्याची तयारी करण्यात आल्याचं मागील काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं आणि एकाएकी बाजारपेठेतून हे फोनच बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली. पण, असं नेमकं का माहितीये? 

मुळच्या दक्षिण कोरियातील सर्वात मोठ्या Samsung Electronics पुढं सध्या अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या अडचणी आहेत कर्मचारी संपाच्या. रॉयटर्सच्या वृत्तानुसार कमाल वेतन आणि काम करण्यासाठी कामगारांच्या पूरक परिस्थितीसंदर्भातील मागणीमुळं सध्या हा संप पुकारण्यात आला आहे. 

सॅमसंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सोन वू-मोक यांच्या माहितीनुसार जवळपास 28000 कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधीत्वं करणाऱ्या या संघटनेनं अनिश्चित काळासाठी ही संपाची हाक दिली आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे. सध्याच्या या संपावर संपूर्ण व्यवसाय क्षेत्राची नजर असून, दक्षिण कोरियामध्ये यामुळं मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दक्षिण कोरियामध्ये कैक वर्षांसाठी सॅमसंगनं कर्मचाऱ्यांना संघटना स्थापन करण्याची परवानगी दिली नव्हती. पण, आता मात्र ही परवानगी मिळाल्यामुळं कर्मचारी अधिक सातत्यानं त्यांच्या मागण्यांना वाचा फोडताना दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायब 

हजारे कर्मचारी एकाच वेळी संपावर असल्यामुळं येत्या काळात सॅमसंगच्या व्यवसायावर याचा थेट परिणाम होणार ही बाब नाकारता येत नाही. हल्लीच कंपनीला चिप तयार करणाऱ्या विभागाकडून अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यातच एआयच्या उपलब्धतेमुळंही सध्या सॅमसंगला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना या अडचणींमध्ये नव्यानं भर पडताना दिसत आहे. 

दरम्यान, सॅमसंगमधील कर्मचाऱ्यांचा हा संप नेमका किती दिवस चालेल याची काहीच कल्पना नसल्यामुळं याचा कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार हे नक्की. पण, हा परिणाम नेमका कोणत्या स्वरुपातील असेल हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तूर्तास कंपनीकडून आगामी काळासाठीच्या निर्धारित बेतानुसारच काम होणार असून, आता येत्या काळात भारतीय बाजारपेठेतूनही सॅमसंगच्या उत्पादनांच्या कामगिरीवर सर्वांचंच लक्ष असेल.