देशातील अनेक ग्राहक कार खरेदी करताना टाटा मोटर्सला पसंती देतात. टाटाच्या कारमधील सेफ्टी फिचर्स आणि ब्रँडवरील विश्वास यामुळे अनेकजण टाटा मोटर्सला प्राधान्य देतात. गेल्या काही काळात टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपल्या अनेक इलेक्ट्रिक कार आणल्या आहेत. दरम्यान कंपनीने नुकतंच या कारच्या किंमतीत घट करत असल्याची घोषणा करत ग्राहकांनी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आपली प्रसिद्ध इलेक्ट्रिक एसयुव्ही Nexon EV पासून इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV च्या किंमतीत 1 लाख 20 हजारांपर्यंत घट करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सुवर्णसंधी आहे.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपली अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार Nexon EV च्या किंमतीत तब्बल 1 लाख 20 हजारांनी घट केली आहे. त्यामुळे आता नेक्सॉन इलेक्ट्रिकचं बेस व्हर्जन फक्त 14 लाख 49 हजारात खरेदी करता येणार आहे. तर Nexon EV लाँग रेंज व्हर्जनसाठी 16 लाख 99 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
नेक्सॉनच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये कंपनीने 7.2kW क्षमतेचा AC चार्जर दिला आहे. ज्याच्या मदतीने मिड रेंड व्हेरियंटची बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी 4.30 तास आणि लाँग रेंजला 6 तास लागतात. तर डीसी फास्ट चार्जरने ही वेळ 56 मिनिटांनी कमी होते.
टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, देशातील बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार Tiago EV च्या बेस मॉडेलची किंमत 70 हजारांनी कमी कऱण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची किंमत फक्त 7 लाख 99 हजार रुपये (एक्स-शोरुम) झाली आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आपण किंमतीत घट केल्याचा टाटा मोटर्सचा दावा आहे.
टियागो चार वेगवेगळ्या पर्यायात उपलब्ध आहे. 15A घरगुती सॉकेटशी कनेक्ट करून चार्ज होण्यासाठी अंदाजे 6.9 तास (19.2 kWh) ते 8.7 तास (24 kWh) लागतात. तर 3.3 kW क्षमतेच्या AC चार्जरला 5.1 तास (19.2 kWh) आणि 6.4 तास (24 kWh) लागतात. याशिवाय, त्याची बॅटरी 7.2 kW क्षमतेच्या AC चार्जरसह 2.6 तास (19.2 kWh) आणि 3.6 तास (24 kWh) मध्ये चार्ज होते. त्याची बॅटरी DC फास्ट चार्जरने 10-80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 57 मिनिटे घेते.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शिअल ऑफिसर विवेक श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे की, "इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीत बॅटरीची किंमत महत्वाचा भाग असतो. बॅटरींच्या किमतीत घट झाली असून, आम्ही ग्राहकांना त्याचा थेट फायदा होण्यासाठी हा पर्याय निवडला आहे".
पुढे ते म्हणाले की, "गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. देशभरातील इलेक्ट्रिक वाहनांना अधिक सुलभ बनवून मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या पोर्टफोलिओत आधीपासूनच स्मार्ट, फिचर रिच इलेक्ट्रिक वाहनं आहेत. किंमत कमी झाल्याने मोठा ग्राहकवर्ग Nexon EV आणि Tiago EV यांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल असा आमचा विश्वास आहे".