Twitter Blue Tick: टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या (Twitter) खरेदीनंतर अनेक नवे बदल केले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे ‘ब्लू टिक’ (Blue Tick ) सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवीन मालक एलन मस्क यांनी ट्विटरवर ‘ब्लू टिक’ची (Blue Tick) किंमत जाहीर केली आहे. यानंतर बनावट खात्यांकडून गैरवापर झाल्यानंतर ट्विटरनं गेल्याच आठवड्यात लॉन्च केलेली आठ डॉलर्स सबस्क्रिप्शनची ‘ब्लू टिक’ सेवा स्थगित केली. ही सेवा पुन्हा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न विचारले जात असतानाच ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘ट्विटर ब्लू’ सेवा पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत कदाचित पुन्हा सुरु होईल, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.
Probably end of next week
— Elon Musk (@elonmusk) November 13, 2022
काय म्हणाले एलन मस्क?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. यासह, शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 रोजी, अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या iOS ॲपवर 8 डॉलर सबस्क्रिप्शन प्रोग्राम पाहिला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मस्कने गेल्या महिन्यात ट्विटर विकत घेण्यापूर्वी ब्लू टिक्स फक्त सेलिब्रिटी, पत्रकार, राजकारणी इत्यादींसाठी उपलब्ध होते आणि ट्विटर खाती प्रमाणित करण्यासाठी वापरण्यात यायचे. मस्कच्या नवीन नियमांनुसार आता फोन, क्रेडिट कार्ड आणि दरमहा 8 डॉलर खर्च करण्याची क्षमता असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ब्लू टिक मिळू शकेल. त्यामुळे गैरप्रकार वाढल्यानं ही सेवा स्थगित करण्याची नामुष्की ट्विटरवर ओढवली.
दरम्यान, या प्रकारानंतर कंपनीने हाय प्रोफाईल खात्यांसाठी नव्याने अधिकृत बॅजेस तयार केले आहेत. कंपनीच्या अंतर्गत मंजूर यादीनुसार व्यवसाय आणि माध्यमांशी संबंधित खात्यांवर ‘ग्रे बॅज’ दिसून येत आहे. ‘ट्विटर ब्लू’ सेवा स्थगित करण्याआधी कंपनीने महत्त्वाच्या खात्यांसाठी हा बॅज तयार केला आहे.
वाचा : अनेक आजारांपासून दूर ठेवतो दयाळू स्वभाव, जाणून घ्या दयाळू दिनाचं महत्त्व
व्हेरिफाईड ‘ब्लू टिक’चा युजर्सकडून गैरवापर
व्हेरिफाईड ‘ब्लू टिक’साठी (Verified 'Blue Tick) सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाली होती. एका युजरने त्याच्या खात्यावर सुपर मारिओचा फोटो वापरून आक्षेपार्ह ट्वीट केले होते. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने फार्मा कंपनी ‘इली लीली’ या नावाचा वापर करत इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटलं होते. या ट्वीटमुळे कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली. ट्विटरच्या एका युजरने ‘टेस्ला’ कंपनीच्या सुरक्षा रेकॉर्डचीदेखील खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता ट्विटर ब्लू’ सेवा पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत कदाचित पुन्हा सुरु होईल, अशी माहिती मस्क यांनी दिली.