'व्होडाफोन-आयडिया'च्या ग्राहकांना धक्का, टॅरिफ शुल्क वाढणार

रिलायन्स जिओपाठोपाठ आता व्होडाफोन-आयडियानेही ग्राहकांना धक्का दिला आहे. 

Updated: Nov 18, 2019, 08:51 PM IST
'व्होडाफोन-आयडिया'च्या ग्राहकांना धक्का, टॅरिफ शुल्क वाढणार

मुंबई : रिलायन्स जिओपाठोपाठ आता व्होडाफोन-आयडियानेही ग्राहकांना धक्का दिला आहे. १ डिसेंबरपासून व्होडाफोन-आयडियाटं टॅरिफ शुल्क वाढणार आहे. व्होडाफोनला दुसऱ्या तिमाहीमध्ये सर्वाधिक ५०,९२२ कोटी रुपयांचा तोटा झाला, तसंच एजीआरबाबतचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने कंपनीविरोधात दिला. यानंतर कठीण आर्थिक परिस्थितीतून जात असलेल्या व्होडाफोन-आयडियाने त्यांचं शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना फोन कॉल, एसएमएस आणि इंटरनेट डेटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

भारत सरकार टेलिकॉम कंपन्यांकडून एजीआर म्हणजेच एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू वसूल करते. पण हा रेव्हेन्यू सरकारने वसूल करू नये, यासाठी टेलिकॉम कंपन्या आग्रही होत्या. पण सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम कंपन्यांना दिलासा दिला नाही. व्होडाफोनचं केंद्र सरकारकडे एजीआरचं ४४,२०० कोटी रुपयांचं देणं बाकी आहे.

जगभराच्या तुलनेत भारतात मोबाईल डेटा शुल्क अत्यंत कमी आहे. देशात टेलिकॉम कंपन्यांची आर्थिक स्थितीही अत्यंत बिकट आहे. अशात टेलिकॉम कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कॅबिनेट सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांना विनाअडथळा सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं व्होडाफोनकडून सांगण्यात आलं आहे.

व्होडाफोनची भारतातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी कंपनीचे सीईओ निक रीड यांनी केलं होतं. तसंच लवकरच उपाययोजना करण्याचंही रीड म्हणाले होते. व्होडाफोन भारतातला व्यापार बंद करणार असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या, पण व्होडाफोनने या बातम्या फेटाळून लावल्या.