मुंबई : Whatsapp वर आपण अगदी डोळेझाकून मेसेज किंवा फोटो किंवा व्हिडीओ पुढे पाठवतो. काहीवेळा आपण ऑडिओ व्हिडीओ देखील नीट ऐकत नाही किंवा पाहात नाही. मात्र आता सुरक्षेच्या दृष्टीनं आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी Whatsapp च्या काही पॉलिसी बदलण्यात आल्या आहेत.
बरेच लोक पॉलिसी न वाचता अॅप वापरतात. पण याकडे दुर्लक्ष केल्यास आणि नियम मोडल्यास तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. तुम्ही पॉलिसीचं पालन केलं नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. पोलिस सातत्याने पॉलिसीचं पालन न केलेल्यांवर गुन्हाही नोंदवू शकतात.
पॉलिसी अंतर्गत, तुम्ही असा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू शकत नाही जो समाजासाठी हानिकारक असेल किंवा समाजात फूट पाडेल. असे केल्याने व्हॉट्सअॅप कंपनी स्वत: त्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव दखल देऊन ते खातं बंद करेल.
व्हॉट्सअॅप दर महिन्याला अशा खात्यांना बॅन करतं. मागच्या दोन महिन्यात कंपनीकडून 16 लाख अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहेत. जर तुम्ही यामध्ये अडकलात तर तुम्हाला स्पष्टीकरणं देणं आवश्यक असेल. तुमची चूक नसेल तर तुम्ही तुमचे खाते परत सुरू करू शकता.
धार्मिक श्रद्धा दुखावणाऱ्या किंवा हिंसाचाराला भडकावणाऱ्या मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो टाकणाऱ्या किंवा फॉरवर्ड करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. अशा व्यक्तीला तुरुंगात पाठवण्याचा अधिकार पोलिसांनाही आहे.
पॉलिसीनुसार हा गुन्हा असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. दिल्लीतील दंगलीनंतर अनेक युजर्सवर कारवाई करण्यात आली. यामागे ते Whatsapp चा उपयोग करून दंगल भडकवत असल्याचं समोर आलं होतं.
चाइल्ड पॉर्न, दंगली भडकवणारे व्हिडीओ किंवा फोटो, असामाजिक मेसेज या गोष्टी पाठवणाऱ्यावर आणि पर्यायाने ग्रूप अॅडमिनवरही कारवाई करण्यात येऊ शकते. याशिवाय आता Whatsapp कंपनी Fact check वर देखील काम करत असून लवकरच ही सेवा देखील युजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे.