गुडविन ज्वेलर्सला टाळं; ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा

दुकानाला टाळं ठोकून मालक, कर्मचारी फरार

Updated: Oct 27, 2019, 07:18 PM IST
गुडविन ज्वेलर्सला टाळं; ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा  title=

आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : जास्त व्याजाच्या लोभानं फसवणूक होण्याचे प्रकार वारंवार घडतायत. आता पुन्हा डोंबिवलीतल्या गुडविन ज्वेलर्सनं शेकडो ग्राहकांना गंडा घातल्याचं समोर आलंय.

डोंबिवलीतलं गुडविन ज्वेलर्स... अनेक शहरांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. २१ ऑक्टोबरला दुकान दोन दिवस बंद राहील, अशी पाटी दुकानाबाहेर लावण्यात आली होती. मात्र आता सात दिवसांनंतरही दुकान उघडलेलं नाही. त्यामुळे ग्राहकांना धक्का बसला मोठा आहे. गुडविन ज्वेलर्समध्ये भिशी, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझीट्स यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्यामुळे शेकडो ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळालंय. 

गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि मॅनेजरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी घरी पोलीस पाठवण्यात आले. मात्र ते घर रिकामं करून गायब झाल्याचं समोर आलं आहे. 

जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वारंवार घडतात. मात्र लोकांचे डोळे उघडत नाहीत. गुडविन ज्वेलर्सही त्याच मालिकेतलं आणखी एक उदाहरण... आता पोलिस या मालकांवर काय करवाई करतात, याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे.