अनिरुद्ध दवाळे, अमरावती : अमरावतीच्या राजापेठ चौकातील उड्डाणपुलावर चार दिवसांपूर्वी मध्यरात्री आमदार रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या आमदार रवी राणा यांनी घेतल्या नव्हत्या. त्यामुळे हा पुतळा वादाच्या भोवर्यात अडकला होता. दरम्यान आज मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने हा पुतळा काढला आहे. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी नजर कैदेत ठेवल आहे. सध्या राणांच्या निवास्थानाला छावणीचे स्वरूप आले असून मध्यरात्री तीन वाजतापासून पोलिसांचा कडा पहारा राणा दाम्पत्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांच्या घरासमोर कडक बंदोबस्त असल्याची माहिती समोर येत आहे.
राजपेठ उडाणपुलाला छावणीचे स्वरूप....
अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर चार दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या उड्डाण पुलाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता.
परंतु या पुतळ्यावरून शहरात मोठे राजकारण तापले होते. आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता हा पुतळा बसवला होता. आज रविवारी पहाटे पहाटे हा पुतळा शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशासनाने काढला आहे.
राणा दाम्पत्य नजरकैदेत....
ही कारवाई करताना आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत राणा यांच्या घरासमोर पोलीस मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. दरम्यान पुतळा काढतेवेळी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोपही युवा स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.