सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांची हत्या केली, सीबीआयचा कोर्टात दावा

अंदुरेला रसद पुरवणाऱ्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे.

Updated: Aug 19, 2018, 02:42 PM IST
सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांची हत्या केली, सीबीआयचा कोर्टात दावा title=

पुणे: सचिन अंदुरे यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली, असा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) रविवारी करण्यात आला. सीबीआय आणि एटीएसने शनिवारी औरंगाबादमध्ये संयुक्तरित्या कारवाई करत  सचिन अंदुरेला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज त्याला पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

सचिन अंदुरेनेच डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली. त्याने विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले होते. त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात आणखी तपास करावा लागेल. तसेच अंदुरेला रसद पुरवणाऱ्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस कोठडी मिळावी, अशा युक्तिवाद सीबीआयच्या वकिलांकडून करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत अंदुरेला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

मात्र, अंदुरेच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. केवळ वेळ मारुन नेण्यासाठी आणि राजकीय दबावापोटी सचिन अंदुरेला अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

सचिन अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा रहाणारा आहे. २० ऑगस्ट २०१३ ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती . अवैध शस्त्रसाठाप्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीची देखील दाभोळकरांच्या हत्येत हात असल्याची कबुली चौकशी दरम्यान मिळाली आहे.