सांगली: जतमध्ये पोलिसांकडून जिलेटीनच्या कांड्या, स्फोटकांचे साहित्य आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. येथील पारधी तांड्यावर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. गेल्या दहा वर्षातल्या सर्वात मोठ्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहा जिलेटीन कांड्या, गॅस कटर, गॅस शेगडी, तीन कटावण्या, लोखंडी पाईप, वायर, लोखंडी पाने, दोन लोखंडी प्लग पाने, दोन फ्रेम, एक्सा ब्लेड, फेशर बेल्ड, आठ कटरचे ब्लेड, नायलॉन दोरी, दोन रेग्यूलटर, दोन पाईप कटिंगचे गॅस कटर आणि सहा मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित शिवाजी प्रल्हाद चव्हाण, संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जत तालुक्यातल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. यात तांड्यावरच्या सर्व घरांची झडती घेतली. जिल्हाभर धुडघूस घालत असलेल्या दुचाकी चोरी, घरफोडीच्या मोठ्या घटना घडल्यात. त्या अनुषंगानं रेकार्डवरचे गुन्हेगार असणार्या तांड्यावरची घरे तपासण्यात आली. त्यावेळी दोन संशियतांना ताब्यात घेण्यात आले.