बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जितके आपल्या रोखठोक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. तितकेच त्यांच्या कार्यशैलीबद्दलही. त्यांच्या याच कार्यशैलीवर भाजप आमदार फिदा झाले आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी त्यांचा फॅन आहे, असेही हे आमदार म्हणाले आहेत.
अजित पवार यांच्या कायशैलीवर फिदा होऊन त्याच्यावर स्तुतीसुमने उधळणारे हे आमदार आहेत माण खटावचे आमदार जयकुमार गोरे. बारामती तालुक्यातील नियोजित विकासकामांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आमदार गोरे यांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी दादांचा फॅन आहे. दादांचे काम, दादांचे कर्तृत्व आपल्याला माहित आहे.. दादांची शिस्त मी पाहिली आहे, असे आमदार गोरे म्हणाले.
तर, याच कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही संधी साधून आमदार गोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. बारामतीच्या नेत्यानी जर एखाद्याला हात दिला तर दगडात देखील पाणी काढू शकतात. आमच्या दादांचे तुम्ही तुम्ही तोंड भरून कौतुक केलंय. भाऊ तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात. चुकतो तोच माणूस असतो. आमच्या नेत्याचा उल्लेख चांगला केला आहे. तुमच्या डोक्यात चांगला विचार येउ द्या आणि भविष्यात चांगला विचार करा असं म्हणत भरणे यांनी गोरेना ही ऑफर दिली.