मगरीला रेस्क्यु करण्यासाठी सांगलीची टीम नागपुरात

मगरीचा वावर असलेल्या परिसरात सांगलीच्या टीमनं घेतला आढावा

Updated: Jan 1, 2022, 06:33 PM IST
मगरीला रेस्क्यु करण्यासाठी सांगलीची टीम नागपुरात  title=

नागपूर – शहरात गेल्या दोन महिन्यांपासून नागनाल्यात मगरीचा वावर आहे.कधी महाराजबाग शेजारी नागनाल्यात  तर कधी घाटरोड शेजारील  नागनाल्यात ही मगर अनेकांना दिसली.दरम्यान महाराजबाग शेजारी नाल्यात मगरचा वावार असल्याचं लक्षात आल्यानंतर  वनविभागाच्या वतीने त्या परिसरात पिंजरे सोडण्यात आले. तसेच या  परिसरात गस्त वाढविण्यात आली होती.दरम्यान मगरीला रेस्क्यु करण्यासाठी खास  सांगलीहून एक टीम नागपुरला दाखल झाली आहे. चार जणांची ही टीमनं मगरीचा वावर असलेल्या परिसरात आज पाहणीही केल्याचीही माहिती मिळाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात खासकरून कृष्णा नदीत अनेक मगरींचा वावर आहे. सांगलीच्या परिसरात कृष्णा नदीच्या काठावर तर अनेकदा मगरीचं दर्शन होतं असतं. दुसरीकडे नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात वाघांचं दर्शन होतं असलं तरी नागनाल्यात मगर दिसली आणि शहरात एक चर्चा सुरु झाली. महाराजाबाग प्राणी संग्रहालय आणि घाट रोड शेजारील नाग नाल्यात या मगरीचं अनेक दिवसांपासून वास्तव्य आहे. त्यामुळं या मगरीला रेसक्यु करण्यासाठी वनविभागानं पाऊलं उचलणं सुरु केलं.

  महाराजबाग आणि आजूबाजूच्या परिसरात वनविभागानं पिंजरे सोडले.या परिसरात गस्त वाढविण्यात आली. दरम्यान या मगरीचं रेस्क्यु करण्यासाठी सांगलीहून खास टीमला बोलविण्यात आले आहे. कृष्णा नदीच्या पात्रात मगरी असल्याने अनेकदा सांगलीतील या रेस्क्यु टीमला मगरीशी सामना करण्याची वेळ येते. अनेक घटनांमध्ये येथील मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन ही टीम करते. त्यामुळे तेथील टीमचा मगरी रेस्क्यू करण्याचा, तिला ताब्यात घेण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे तेथील तज्ज्ञ टीमची मदत नागपूर वनविभाग घेणार आहे.त्यादृष्टीन या टीमला नागपुरात पाचारण करण्यात आलं.त्यानंतर ही टीम आज नागपुरात दाखल झाली.

मगरीचा वावर असलेल्या परिसराचा सांगलीच्या टीमनं घेतला आढावा

    नागपुरातील रेस्क्यू ऑपरेशनसाठी सांगलीतील चार जणांची टीम पोहचल्यानंतर आज दुपारनंतर या टीमनं मगरीला वावर असलेला महाराजबाग परिसराचा आढावा घेतला.त्यानंतर रविवारी प्रत्यक्षात या मगरीला रेस्क्यू करण्याच्या हालचाली  सुरु  होण्याची शक्यता  आहे.