Crime News: बॉस्निया येथे पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर रस्त्यावर उतरुन दिसेल त्यांना गोळ्या घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्याने इन्स्टाग्रामवरुन पत्नीच्या हत्येचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती रस्त्यावर उतरला होता. यावेळी त्याने पिस्तूलने एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला गोळ्या घालून ठार केलं. त्याने एक पुरुष आणि महिलेसह एका पोलीस अधिकाऱ्यालाही जखमी केलं. यानंतर त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ईशान्येकडील बॉस्नियातील ग्रॅडॅकॅक शहरात ही घटना घडली आहे. हल्लेखोराने तीन व्यक्तींना जखमी केल्यानंतर आणि पोलिसांनी त्याला पकडण्याआधीच आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने सर्वात आधी पत्नीची हत्या केली. यानंतर तो पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरला. यावेळी त्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला गोळ्या घालून ठार केलं. त्याने एका पोलील अधिकाऱ्यालाही जखमी केलं. वेगवेगळ्या ठिकाणी त्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला आणि पुरुषही जखमी झाले आहेत.
बॉस्नियन फेडरेशनचे पंतप्रधान नर्मिन निक्सिक म्हणाले की “ग्रॅडॅकॅक येथे आज जे घडले त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हल्लेखोराने शेवटी स्वतःचा जीव घेतला, पण पीडितांचे जीवन कोणीही परत आणू शकत नाही”.
पोलिसांनी हल्लेखोराने गोळीबार करण्याचं कारण अद्याप सांगितलेलं नाही. पण हल्लेखोराने आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला याआधी धमक्या दिल्या होत्या. तसंच अनेकदा त्याने हिंसाचारही केला होता. Nermin Sulejmanovic असं या हल्लेखोराचं नाव आहे.
हल्लोखोर पतीने शुक्रवारी सकाळी इन्स्टाग्रामला व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्याने लोकांना तुम्हाला लाईव्ह मर्डर पाहायला मिळेल असं सांगितलं होतं. व्हिडीओत आरोपी पती बंदूक उचलून पत्नीच्या डोक्यात गोळी घालताना दिसत आहे. यादरम्यान, एक बाळ रडत असल्याचाही आवाज दुरून ऐकू येत आहे. हा व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवरुन हटवण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीचा पाठलाग सुरु केला असता त्याने आणखी दोन व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीम केले. यामध्ये त्याने आपण पळून जाताना किमान दोन लोकांना गोळ्या घातल्याचा दावा केला. सुमारे 12,000 लोकांनी हत्या लाईव्ह पाहिली असून व्हिडिओला 126 लाईक्स मिळाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मानवाधिकार मंत्री सेविड हर्टिक यांनी हे आपल्या समाजासाठी फार लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.
2020 आणि 2021 मध्ये 19 महिलांची हत्या करण्यात आला आहे.बॉस्नियाची लोकसंख्या ३.२ दशलक्ष आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 35 वर्षीय आरोपी हा बॉडीबिल्डर आणि फिटनेस कोच होता. त्याला अंमली पदार्थांची तस्करी आणि पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
तसंच पोलिसांनी सांगितलं आहे की, ज्या लोकांनी शुक्रवारी आरोपीच्या इंस्टाग्राम पोस्टवर समर्थन संदेश लिहिले त्यांची चौकशी केली जाईल आणि कदाचित कायदेशीर परिणाम भोगावे लागतील.