बालाकोट स्ट्राईकनंतर 43 दिवसांनी जगातील मीडियाला घेऊन पाकिस्तान घटनास्थळी

 एअर स्ट्राईकनंतर कित्येक दिवस इथे पत्रकारांना येण्यास बंदी होती. 

Updated: Apr 11, 2019, 10:43 AM IST
बालाकोट स्ट्राईकनंतर 43 दिवसांनी जगातील मीडियाला घेऊन पाकिस्तान घटनास्थळी  title=

बालाकोट : बालाकोट एअरस्ट्राइकच्या 43 दिवसांनंतर पाकिस्तानी सेनेने आंतरराष्ट्रीय पत्रकारांची एक टीम आणि परदेशातील महत्त्वाच्या व्यक्तींना घटनास्थळावरील मदरसा आणि त्याच्या आजुबाजूच्या परिसराचा दौरा घडवला. भारताने याच ठिकाणी जैश ए मोहम्मदच्या सर्वात मोठ्या ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला केला होता. एअर स्ट्राईकनंतर कित्येक दिवस इथे पत्रकारांना येण्यास बंदी होती. तसेच स्थानिक लोकांनाही या आवारात जाण्यास मज्जाव होता. पण आता 43 दिवसांनंतर पाकिस्तानला उपरतीस सुचली असून त्यांनी जगभरातील माध्यमांना बालाकोट येथे आमंत्रित केले आहे. 

या टीमला एका हॅलीकॉप्टरमधून इस्लामाबादहून बालाकोट येथे नेण्यात आले. हिरव्या गार झाडांनी घेरलेल्या डोंगरावरील मदरशा पर्यंत पोहोचण्यासाठी साधारण दीड तास चालत जावे लागते असे बीबीसी उर्दूने म्हटले आहे. जेव्हा ही टीम मदरशाचा आतमध्ये पोहोचली तिथे 12-13 वर्षांचे साधारण 150 विद्यार्थी उपस्थित होते. त्यांना कुराण शिकवले जात होते. टीमचा हा दौरा 20 मिनिटांचा होता. यावेळी पत्रकारांनी काही शिक्षकांशी बातचित केली. यावेळी पत्रकारांनी जेव्हा स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा 'लवकर करा..जास्त वेळ बोलू नका' असे म्हणत घाई करण्यात आली. 

Image result for balakot air strike dna

पत्रकारांच्या टीमने डोंगर चढत असताना एक मोठा खड्डा देखील पाहीला. जिथे भारतीय विमानांनी विस्फोटके पाडली होती. या ठिकाणी जुना मदरसा आहे. तो पहिल्यापासून असाच होता असे यावेळी सेनेचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकारांना सांगितले. इथे आणण्यासाठी 43 दिवस का लावले असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. वातावरण अस्थिर झाल्याने तणाव वाढला होता. ही वेळ मीडिया टुर साठी योग्य असल्याचे गफूर म्हणाले. 

14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 40 जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. 26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट येथे जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्पवर एअरस्ट्राईक केला. यामध्ये मोठ्या संख्येत दहशतवादी मारले गेल्याचा भारताचा दावा आहे. तर इथे केवळ काही झाडांचे नुकसान झाले असून एक व्यक्ती जखमी झाल्याचे पाकिस्तानतर्फे सांगण्यात आले.पत्रकारांच्या टीमला घटनास्थळी नेण्यात येईल असे पाकिस्तानतर्फे सांगण्यात आले होते. पण आता 43 दिवसांच्या नंतर जगभरातील माध्यम प्रतिनिधींना बालाकोट येथील मदरशामध्ये नेले.