दहशतवादी अफजल गुरूच्या मुलाची पासपोर्टसाठी सरकारला विनंती

परदेशी शिक्षणासाठी पासपोर्ट मिळायला हवा, असं अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यानं म्हटलंय

Updated: Mar 5, 2019, 04:09 PM IST
दहशतवादी अफजल गुरूच्या मुलाची पासपोर्टसाठी सरकारला विनंती

नवी दिल्ली : २००१ साली भारतीय संसदेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा दोषी अफजल गुरू याच्या मुलानं भारत सरकारकडे आपल्याला पासपोर्ट देण्याची विनंती केलीय. आपल्याला पुढच्या शिक्षणासाठी परदेशात स्कॉलरशिप मिळत आहे त्यामुळे आपल्याला परदेशी शिक्षणासाठी पासपोर्ट मिळायला हवा, असं अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यानं म्हटलंय. 

माझ्याकडे आधार कार्ड आहे त्यामुळे मला पासपोर्ट मिळायला हवा, असं गालिबनं म्हटलंय. संसद हल्ल्यातील दोषी दहशतवादी अफजल गुरू याला २०१३ साली फाशीची शिक्षा बजावण्यात आली होती. 

'मला तुर्कस्तानात मेडिकलसाठी स्कॉलरशिप मिळतेय. माझ्याकडे आधार असेल तर मला पासपोर्ट मिळायला हवा' असं गालिबनं न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना म्हटलंय. 

जानेवारी २०१८ मध्ये गालिब गुरुला बारावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळाले होते. काश्मीर बोर्डाच्या निकालानुसार, गालिबनं एकूण ५०० पैंकी ४४१ अंक मिळवले होते. त्याला सर्व म्हणजे पाचही विषयांत 'ए' ग्रेड मिळाला होता. गालिबला भविष्यात डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. 

सायन्सचा विद्यार्थी असलेल्या गालिबनं बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे विषय घेतले होते. त्याला सर्वच विषयांत ८० हून जास्त गुण मिळालेत. पीसीबी शिवाय त्यानं एन्व्हायरमेन्टल सायन्सही घेतलं होतं. यामध्ये त्यानं सर्वाधिक म्हणजे ९४ गुण मिळवले.

जम्मू - काश्मीरच्या शाळेत दहावीच्या परीक्षा बोर्डात गालिब टॉपर राहिला होता. गालिबनं दहावीमध्ये ५०० पैंकी ४७४ गुण मिळवले होते. 'माझ्या आई-वडिलांचं आणि माझ्या कुटुंबाचं स्वप्न आहे की डॉक्टर बनावं... ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे' अशी प्रतिक्रिया त्यानं २०१६ साली व्यक्त केली होती.