Air India Express Plane : अबु धाबीहून (Abu Dhabi airport) केरळच्या (kerala) कालिककडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) विमानाच्या एका इंजिनला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी उड्डाण केल्यानंतर विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनाला आग लागली. वैमानिकाला याची माहिती मिळताच त्याने विमान पुन्हा विमानतळावर उतरवले. वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशांचा जीव वाचला आहे. उड्डाण घेताच फ्लाइटच्या एका इंजिनमध्ये अचानक आग लागली आणि पायलटने समजूतदारपणा दाखवत विमान पुन्हा अबू धाबी विमानतळावर उतरवले.
एअर इंडिया एक्स्प्रेसनुसार, बी737-800 या विमानाच्या इंजिनला आग लागली होती. टेक-ऑफ दरम्यान, या घटनेनंतर विमानाला परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या. डीजीसीएनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. अबुधाबीहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या या विमानामध्ये 184 प्रवासी होते. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमानात आग लागली. विमानाच्या पायलटला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी विमानाचे अबुधाबी येथे इमर्जन्सी लँडिंग केले. आता सर्व प्रवासी सुरक्षित असून अपघाताच्या कारणाचा शोध सुरू आहे, असे एअर इंडिया एक्स्प्रेसने म्हटलं आहे.
नेमकं काय झालं?
डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने एएनआयला दिलेल्या वृत्तानुसार, 'बोईंग 737-800 अबू धाबीवरुन कालिकत येथे येत असताना 1,000 फुटांवर पहिल्या क्रमांकाच्या इंजिनला आग लागल्याने विमान परत बोलवण्यात आले.' फ्लाइट-ट्रॅकिंग FlightRadar24 नुसार, विमानाने भारतीय वेळेनुसार पहाटे 3.29 वाजता उड्डाण केले आणि 45 मिनिटांपेक्षा कमी वेळात लँड केले. विमानाने 1,975 फूट उंची गाठल्यानंतर हा सर्व प्रकार घडला.
दरम्यान, गेल्या वर्षी 14 सप्टेंबरलाही अशीच घटना घडली होती. मस्कत विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे समोर आले होते. या विमानात 141 प्रवासी आणि चार मुले आणि सहा क्रू मेंबर्स होते. डीजीसीएने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते, असे एअर इंडिया एक्सप्रेसने म्हटले होते.