वर्णद्वेषावरून अमेरिकेत भडका : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लपण्याची वेळ

वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसा भडकण्यास सुरुवात झाली आहे. 

Updated: Jun 1, 2020, 03:55 PM IST
वर्णद्वेषावरून अमेरिकेत भडका : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लपण्याची वेळ title=
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन : वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसा भडकण्यास सुरुवात झाली आहे. अतिशय संवेदनशील अशा मुद्द्यावरुन उडालेला हा भडका आता थेट अमेरिकेची सूत्र हातळल्या जाणाऱ्या व्हाईट हाऊसपर्यंत येऊन पोहोचला आहे. जवळपास ३० हून अधिक शहरांमध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसच्याच बंकरमध्ये लपण्याची वेळ आली. 

आंदोलकांची हिंसक कृत्यं सुरु असतानाच यामध्ये व्हाईट हाऊसच्या परिसरात असणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. हे सर्व चित्र पाहता सिक्रेट सर्व्हिस एजंटनं सुरक्षेच्या कारणस्तव ट्रम्प यांना बंकरमध्ये नेलं. जवळपास अर्ध्या तासासाठी डोनाल्ड ट्रम्प हे बंकरमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, अमेरिकेत बहुतांश भागांमध्ये संचारबंदीचे निर्देश असतानाही व्हाईट हाऊस परिसरात सुरु असणाऱी आंदोलनं मात्र शमली नाहीत. यावेळी आंदोलकांडून जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला गेला. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत ट्रम्प सरकारविरोधातील वातावरण आणखी बळावलं आहे. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातच आता वर्णभेदावरुन सुरु असणारी एकंदर हिंसा पाहता ट्रम्पविरोधी वातावरणात भर पडू लागली आहे. परिणामी आगामी निवडणुकाांच्या दृष्टीनेही ट्रम्प यांच्यापुढे बऱ्याच अडचणी उभ्या असल्याचं चिन्हं आहे. 

प्रकरणाची सुरुवात 

२० डॉलरची बनावट नोट दिल्याप्रकरणावरुन या वादाला तोंड फुटलं. एका दुकानातून सिगरेटचं पाकिट खरेदी केल्यानंतर फ्लॉईडने बनावट नोट दिल्याप्रकरणी दुकानातील कर्मचाऱ्यानं पोलिसांत तक्रार दाखल केली. फ्लॉईड मुळचा बाऊंसर होता. पण, कोरोना संकटात त्यांना नोकरी गमवावी लागली होती. फ्लॉ़ईड हा त्या दुकानातील नेहमीचा ग्राहक होतात. पण, त्याची तक्रार केली तेव्हा दुकानमालक तेथे उपस्थित नव्हता. किंबहुना कर्मचारीसुद्धा नियमांचं पालन करतच त्यानं तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. 

 

काय आहे नेमका वाद? 

अमेरिकेत पाहायला मिळणाऱ्या असंतोषाच्या वातावरणाकडे आता वर्णभेदाच्या नजरेतून पाहिलं जाऊ लागलं आहे. एका कृष्णवर्णीय व्यक्ती पोलीस कारवाईरम्यान मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जॉर्ज फ्लॉईड नामक या इसमाला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यासाठी म्हणून पोलीस पथक गेलं होतं. जॉर्जला पाहताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न केला. ज्याचा जॉनकडून विरोध करण्यात आला. 

जॉर्जने आपल्यावर होणाऱ्या कारवाईचा विरोध करताच एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याला जमिनीवर आपटलं. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका कारच्या मागील चाकापाशी जॉर्ज पडून होता आणि त्याच्या गळ्यावर पाय देऊन तो पोलीस अधिकारी जवळपास सात मिनिटांसाठी उभा होता असं सांगण्यात येतं. 

 

पोलीस अधिकाऱ्याकडून मानेवर पाय ठेवलेला असताना मला श्वास घेता येत नाही I Can`t breath आहे, असं म्हणाऱ्या जॉर्जचा व्हिडिओ चित्रीत केला गेला. असं म्हटलं जात आहे की, पोलीस अधिकाऱ्यानं दीर्घ काळासाठी जॉर्जचा गळा दाबल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. अमेरिकेत सध्या सुरु असणाऱ्या हिंसेचं हेच मुळ कारण असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा वर्णभेदाच्या मुद्द्यानं राष्ट्राध्यक्षांचं दार ठोठावलं आहे.