पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी सुरु असल्यासंदर्भात मोदींना विमानातच देण्यात आली माहिती

PM Modi Briefed On Wagner Group: शनिवारी अचानक रशियाविरुद्ध युक्रेन युद्धाला नाट्यमय वळण मिळाल्याचं पहायला मिळालं. रशियाकडून लढणाऱ्या एका मोठ्या गटाने पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 25, 2023, 10:47 AM IST
पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी सुरु असल्यासंदर्भात मोदींना विमानातच देण्यात आली माहिती title=
मोदींनी घेतली यासंदर्भातील माहिती

PM Modi Briefed On Wagner Group: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याविरोधात सशस्त्र बंडखोरीचा प्रयत्न शनिवारी घडला. येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या नेतृत्वाखाली 'वॅगनर ग्रुप'ने (Wagner Group) ही बंडखोरी केली. मात्र अवघ्या 24 तासांमध्ये ही बंडखोरी शांत करण्यात रशियन सरकारला यश आलं. बेलारुसच्या मध्यस्थीने पुतिन आणि प्रोगोझिन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. मात्र हे सर्व बंडखोरीचं सत्र सुरु असताना भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) शनिवारीच यासंदर्भातील माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदींना या घडामोडींसंदर्भात सविस्तरपणे माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

मोदींनी कोणी दिली माहिती

पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचा दौरा संपवून इजिप्तच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्यानंतर प्रवासादरम्यान त्यांना रशियातील या बंडखोरीसंदर्भात माहिती देण्यात आली. वॉशिंग्टन डीसी ते कायरो विमानप्रमावासादरम्यान विमानातच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदींनी या बंडखोरीबद्दलचा संपूर्ण तपशील दिला. पुतिन आणि रशियाचा अभ्यास असलेल्या आणि तेथील सध्याच्या परिस्थितीची माहिती असलेल्या जाणकार अधिकाऱ्यांनी मोदींनी संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली असं सूत्रांनी म्हटलं आहे. 

पुतिन मोदींच्या नेतृत्वाखालील बैठकीत होणार सहभागी

शांघाई कॉर्परेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीमध्ये पुतिन सहभागी होणार आहेत. ऑनलाइन माध्यमातून होणारी ही बैठक मोदींच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या बैठकीला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर पाकिस्तानी नेतेही सहभागी होणार आहेत. ही बैठक 4 जूलै रोजी होणार आहे. यापूर्वी ही बैठक दिल्लीमध्ये होणार होती. या बैठकीसाठी सर्व नेते दिल्लीत येणार होते. मात्र नंतर ही बैठक ऑनलाइनच घेण्याचं ठरवण्यात आलं. 

भारताकडून प्रतिक्रिया नाही

भारत सरकारचं रशियामधील घडामोडींवर बरीक लक्ष आहे. मात्र शनिवारी झालेल्या घडामोडींबद्दल भारत सरकारने कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. मात्र 'वॅगनर ग्रुप'ने केलेली बंडखोरी ही 'युद्धाला होत असलेल्या विरोधाचे' प्रतिबिंब असल्याची भारताची भूमिका आहे. सातत्याने सैनिक, उपकरणे आणि पुरवठ्यासंदर्भात निर्माण होत असलेला तुटवडा आणि मोठ्याप्रमाणात होणारं नुकसान याचमुळे बंडखोरांकडून हा विरोध केला जात असल्याचं समजतं.

दूतावासाजवळ विशेष सुरक्षा

पुतिन यांनी टीव्हीवरुन दिलेल्या भाषणामध्ये, "आपल्याबरोबर जे काही घडत आहे तो विश्वासघात आहे. खासगी हेतूमुळे आपल्या देशावर हे संकट ओढावलं आहे. आपलं लष्कर या गटाच्या बंडखोरीला अगदी शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून लढत राहील," असा विश्वास व्यक्त केला होता. "कोणतंही अंतर्गत बंड हे देशाच्या ऐक्यासाठी धोकादायक असतं. ही बंडखोरी रशिया आणि रशियन लोकांसाठी मोठा धक्का आहे. आम्ही ही बंडखोरी मोडू काढण्यासाठी जे काही करु ती प्रतिक्रिया फारच कठोर असेल. ज्यांनी जाणीवपूर्वकपणे हा विश्वासघाताचा मार्ग निवडला आहे, त्याबद्दल नियोजन करत आहेत. आम्हाला ब्लॅकमेल करत आहेत. दहशत पसरवत आहेत त्या सर्वांना कठोर शिक्षा दिली जाईल," असा इशाराही पुतिन यांनी दिला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून मॉस्कोमधील भारतीय दूतावासाजवळ विशेष सुरक्षा पुरवण्यात आली होती.