बॅडमिंटन खेळताना 17 वर्षांच्या खेळाडूचा मृत्यू, कॅमेरात कैद झाली घटना... पीव्ही सिंधूने व्यक्त केलं दु:ख

बॅडमिंटन कोर्टवरच एका 17 वर्षांच्या खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मृत्यू झालेला तरुण राष्ट्रीय खेळाडू होता, भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पिव्ही सिंधूनेही या खेळाडूच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 3, 2024, 08:16 PM IST
बॅडमिंटन खेळताना 17 वर्षांच्या खेळाडूचा मृत्यू, कॅमेरात कैद झाली घटना... पीव्ही सिंधूने व्यक्त केलं दु:ख title=

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात एका तरुणाचा स्विमिंग करुन पूलच्या बाहेर पत असताना मृत्यू झाला. आता अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॅडमिंटन कोर्टवरच एका 17 वर्षांच्या खेळाडूचा मृत्यू (Badminton Player Death) झाल्याची घटना समोर आली आहे. मृत्यू झालेला तरुण राष्ट्रीय खेळाडू होता, बॅडमिंटन खेळताना हा खेळाडू जमिनीवर कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पिव्ही सिंधूनेही (PV Sindhu) या खेळाडूच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. 

काय आहे व्हयारल व्हिडिओत?
हा व्हिडिओ इंडोनिशियातला (Indonesia) आहे. इंडोनेशियातील योग्याकार्तामध्ये आशियाई ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. यात जापानाच काजुमा कवानो विरुद् चीनच्या झांग झी जाई (zhang zhi jie) यांच्यात लढत रंगली होती. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे काजुमा कवानो  आणि झांग झी जाई यांचा सामना सुरु असताना काजुमा कवानोने शॉट खेळल्यानंतर शटल झांग झी जाईच्या कोर्टात येऊन पडतो. शटल मारण्यासाठी झांग झी जाई बॅडमिंटन रॅकेट पुढे करत असतानाच अचानक तो जमिनीवर कोसळतो. 

झांग झी जाई खाली कोसळल्यानंतर तो काही क्षण तो तडफडतानाही दिसतोय. धक्कादायक म्हणजे झांग झी जाई खाली कोसळल्यांतर काही क्षण कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. समोरचा खेळाडूनेही केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं या व्हिडिओत दिसतंय. काही वेळावे वैद्यकीय टीममधील एक व्यक्ती धावत येतो आणि झांग झी जाईला तपासताना दिसतोय. पण झांग झी जाई कोणतीच हालचाल करत नाही. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच झांग झी जाईचा मृत्यू झाला होता.

डॉक्टरांनी झांग झी जाईचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. अवघ्या सतराव्या वर्षात हार्टअटॅकच्या मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

पीव्ही सिंधूने व्यक्त केला शोक
या घटनेने क्रीडा क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने एक्सवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'ज्युनिअर एशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये युवा बॅडमिंटन खेळाडू झांग झी जाईच्या निधनाची बातमी खूपच दु:खद आहे. झांगच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, जगाने एक चांगला खेळाडू गमावला' असं सिंधूने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.