राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यातच आता छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) भाजपसोबत जावं, अवहेलना करणाऱ्या पक्षात राहू नये अशी मागणी समर्थकांनी नाशिकच्या संघर्ष सभेत करण्यात आली आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर अस्मितेचा आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
"येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर अस्मितेचा आहे," अशा भावना व्यक्त केल्या असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
"आपण अनेक मंत्रीपदावर काम केलं आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करतो आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्रीपदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही असे ग्वाही दिली," असं छगन भुजबळांनी सांगितलं आहे.
येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर अस्मितेचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
आपण अनेक मंत्रीपदावर काम केलं आहे. गेल्या ४०… pic.twitter.com/KzcKpEt1xM
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 18, 2024
तसंच येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल आभार मानले. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकरांना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला-लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंध ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही दिली असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आम्ही सदैव आपल्यासोबत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या असल्याचंही ते म्हणाले आहेत.