झुरीच : मेहरान मारी या बलुच नेत्याला झुरीच विमानतळावर पत्नी आणि मुलांसह स्थानबद्ध केलं आहे. पाकिस्तान सरकारच्या विनंतीवरुन स्वित्झर्लंडच्या यंत्रणेने हे पाउल उचलल्याचं ट्विट करून मेहरान मारी यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानी लष्कराचा हा डाव असून असं मेहरान मारी म्हणतात. काळजी करू नका, बलुचींना असे प्रकार नवीन नाहीत, याचीही ते आठवण करून देतात. मेहरान मारी हे स्वतंत्र बलुचिस्तान लढ्याचे महत्वाचे नेते आहेत. ते दिवंगत बलुच नेते नवाब खैर बक्श मारी यांचे सुपूत्र आहेत.
बलुच रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष, ब्रहमदाघ बुक्ती यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी मेहरान मारी स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले होते. ब्रहमदाघ बुक्ती यांनी स्वतंत्र बलुचिस्तानचा लढा स्वित्झर्लंडमधून सुरू ठेवला आहे.
बहुसंख्य स्वतंत्र बलुचिस्तान लढ्याच्या नेते निर्वासित झाले असून त्यांनी स्वतंत्र बलुचिस्तानचा लढा सुरूच ठेवला आहे. पाकिस्तानी लष्कराने बलुच नागरीकांवर प्रचंड अत्याचार चालवले असून बलुची समाज त्याविरूद्ध एकजुटीने लढत आहेत.