नवी दिल्ली : भारताच्या नौदल प्रमुखांनी चीनी नौदलाच्या पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातल्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केलीय.
ग्वादर बंदर हे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये आहे. चीन आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार ग्वादर बंदराचा वापर चीन व्यापारवृद्धीसाठी वापरण्यात येणार आहे. पाकिस्तानचासुद्धा यात फायदा आहे. परंतु चीन याचा वापर लष्करी हेतुंसाठी करतोय. ग्वादर बंदराचं लष्करी डावपेचांच्या दृष्टीने महत्व प्रचंड आहे.
चीनच्या अनेक युद्धनौका ग्वादर बंदरात ठाण मांडून असतात. याबद्दल बोलताना भारताच्या नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी चिंता व्यक्त केलीय. चीनच्या या डावपेचांना उत्तर देतांना भारतालासुद्धा वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करावा लागेल. चीनी कंपन्यांचा ग्वादर बंदरात मोठा आर्थिक वाटा आहे. त्यामुळेच तिथे चीनी पाणबुड्यांचीसुद्धा उपस्थिती आहे, असंही अॅडमिरल सुनील लांबा यांनी म्हटलयं.
यासंदर्भात एकंदरीतच चीनच्या दक्षिण आशियातल्या विस्तारवादी धोरणाबद्दल बोलताना अॅडमिरल सुनील लांबा यांनी चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींकडे लक्ष वेधलं. 2008 पासून चीनने या परिसरात युद्धनौका तैनात करण्यास सुरूवात केलीय. साधारणपणे चीन 8 युद्धनौका हिंदी महासागरात तैनात करतंय.
2013 मध्ये चीनी युद्धनौकांची संख्या 14 पर्यत गेली होती. त्याचबरोबर दोन पाणबुड्यांसुद्धा तैनात केल्या आहेत. या सर्वांचा वापर चीनी नौदलाची हिंदी महासागरातील ताकद वाढवण्याबरोबर टेहळणीसाठी आणि हेरगिरीसाठी केला जातोय. भारत या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे.