माजी महापौराच्या घरात सापडलं १३,५०० किलो सोनं

धक्कादायक बाब म्हणजे व्यापार करुन जगातला सर्वात मोठा उद्योजक बनलेल्या जॅक मा याच्याकडंही झांग क्वी एवढी संपत्ती नाही

Updated: Oct 5, 2019, 03:01 PM IST
माजी महापौराच्या घरात सापडलं १३,५०० किलो सोनं
फाईल फोटो

बिजिंग : जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांमध्ये अलिबाबाच्या जॅक माचा समावेश होतो. पण संपत्तीच्या बाबतीत या जॅक माला चीनमधील एका लाचखोरानं मागं टाकलंय. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी महापौराकडं तब्बल साडे तेरा हजार किलो सोनं सापडलंय. त्याची संपत्ती जॅक मा पेक्षाही दुप्पट आहे. सामान्य माणसाला तेरा ग्राम सोनं घेणं परवडत नसताना चीनमधील झांग क्वी या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याकडं तब्बल साडे तेरा हजार किलो सोनं सापडलंय. हे कमी की काय त्याच्या बँक खात्यात ३० अब्ज पौंड एवढी रक्कम जमा आहे. 

चीनच्या हँकाऊ शहरात कम्युनिस्ट पार्टीचा तो सचिव होता. या अगोदर तो डँझाऊ शहराचा महापौर होता. या काळात झांग क्वीनं खोऱ्यानं लाचखोरीचा पैसा कमावला. 

गेल्या काही वर्षात चीनी अधिकाऱ्यांकडं एवढी मोठी संपत्ती सापडण्याचं हे सर्वात मोठं प्रकरण आहे. धक्कादायक बाब म्हणजे व्यापार करुन जगातला सर्वात मोठा उद्योजक बनलेल्या जॅक मा याच्याकडंही झांग क्वी एवढी संपत्ती नाही. 

जॅक मा कडे ३० अब्ज पौंड एवढी संपत्ती आहे. तर झांग क्वी याच्याकडं ५२ अब्ज पौंड एवढी संपत्ती आहे. झांग क्वी याच्याकडं अलिशान बंगले, जमीनही असल्याची माहिती आहे. त्यामुळं त्याची संपत्ती ५२ अब्ज पौंडांपेक्षा जास्त होईल.

आत्तापर्यंत भारतातल्या लाचखोरांची चर्चा होत होती. पण चीनमध्येही भ्रष्टाचारी लोकं आहेत हे या प्रकरणावरुन अधोरेखित झालंय.