Xi Mingze: जिनपिंग यांच्या एकुलत्या एक मुलीचं रहस्यमय आयुष्य! तिचा फोटो शेअर करणारा भोगतोय १४ वर्षांचा तुरुंगवास

Xi Mingze secret life: जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली नेते अशी शी जिनपिंग यांची ओळख असली तरी त्यांच्या मुलीबद्दलची फारच मोजकी माहिती सर्वाजनिकपणे उपलब्ध असल्याने तिच्याबद्दल गूढ निर्माण झालं आहे.

Updated: Jan 13, 2023, 05:55 PM IST
Xi Mingze: जिनपिंग यांच्या एकुलत्या एक मुलीचं रहस्यमय आयुष्य! तिचा फोटो शेअर करणारा भोगतोय १४ वर्षांचा तुरुंगवास title=
Xi Jinping daughter Xi Mingze secret life (Photo- Facebook And Reuters)

Xi Jinping daughter Xi Mingze secret life: जगातील दुसऱ्या सर्वात शक्तिशाली नेत्याच्या एकुलत्या एका मुलीला जगातील फार कमी लोक ओळखतात असं सांगितल्या तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं असून या नेत्याचं नाव आहे चीनचे राष्ट्राध्यक्ष (Chinese president) शी जिनपिंग (Xi Jinping) आणि ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत तिचं नाव आहे शी मिंग्ज (Xi Mingze). आता तुमच्यापैकी अनेकांनी पहिल्यांदाच हे नाव वाचलं असेल. याच कारणामुळे जिनपिंग यांच्या मुलीचं आयुष्य फारच खासगी आणि एका प्रकारे रहस्यमय आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. शी मिंग्जला कायमच प्रसारमाध्यमं आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यात आलं आहे. ही गुप्तता इतकी आहे की तिचा फोटोही सहजासहजी सापडत नाही. या मुलीचं वय किती आहे, ती नेमका काय करते याबद्दल आतापर्यंत कोणीही काहीही लिहून ठेवलेलं नाही किंवा त्याबद्दलचं वृत्तांकन केलेलं नाही. चीनमधील एका व्यक्तीने शी मिंग्जचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याला 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच या व्यक्तीच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

जन्म कधीचा आणि कुठे शिकली?

'न्यूझीलंड हेराल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि त्यांची दुसरी पत्नी तसेच प्रसिद्ध गायिका पेंग लियुआन यांच्या मुलीबद्दलची फारच कमी माहिती सर्वजनिकपणे उपलब्ध आहे. शी मिंग्जचा जन्म 27 जून 1992 रोजी झाला होता. तिने आपलं हायस्कूलपर्यंतचं शिक्षण हांग्जो फॉरेन लँग्वेजेस स्कूलमध्ये फ्रेंच भाषेत पूर्ण केलं. 'चायना टाइम्स'च्या वृत्तानुसार शी मिंग्जचे आजोबा शी झोंगक्सुन हे कम्युनिस्ट विचारसणीचे मोठे समर्थक, क्रांतिकारक आणि माजी सरकारी अधिकारी होते. त्यांनी शी मिंग्जला 'जिओक मुजी' असं टोपणनाव दिलं होतं.

त्याला झाली 14 वर्षांची शिक्षा

'रेडिओ फ्री' आशियाने दिलेल्या वृत्तानुसार 2019 मध्ये न्यू तेंगयू नावाची चिनी व्यक्ती शी मिंग्जमुळे अडचणीत आली होती. शी जिनपिंग यांची मुलगी शी मिंग्जची ओळख पटवून तिचा फोटो या व्यक्तीने एका वेबसाईटवर अपलोड केला होता असा आरोप करण्यात आळा होता. या प्रकरणाची चौकशी झाली आणि या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं. सध्या न्यू तेंगयू नावाचा हा 22 वर्षीय तरुण चीनमधील कारागृहामध्ये 14 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा भोगत आहे. असं सांगितलं जातं की शी मिंग्जच्या भोवती सुरक्षारक्षकांचं कडं असतं. जवळजवळ 24 तास तिच्या आजूबाजूला हे सुरक्षाकडं असतं. 

सध्या कुठे असते?

अमेरिकेत राहणाऱ्या आणि करंट अफेर्स म्हणजेच चालू घडामोडींसंदर्भातील तज्ज्ञ असलेल्या एका चिनी व्यक्तीचे आपल्या युट्यूब चॅनेलवर शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. शी मिंग्ज 2010 पासून मॅसॅच्युसेट्समधील हार्वर्ड विद्यापिठात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली. अमेरिकेतील लोकांना 2012 पर्यंत शी मिंग्जबद्दलचं खरं कळालं. मात्र तिच्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी अद्यापही समोर आलेल्या नाही. आपल्या मुलांना सार्वजनिक आयुष्यापासून आणि प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाही समावेश होतो.